नाशिक : चेनस्नॅचिंग, दुचाकीचोरी, घरफोडी, खून, हाणामारी या गुन्ह्यांचा संख्यात्मकदृष्ट्या विचार करता यामध्ये गत काही दिवसांपासून अल्पशी वाढ झाल्याची कबुली देत, यावर प्रभावी उपाययोजना करण्यात आली असून, त्याचे सदृश परिणाम पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे पोलीस आयुक्त एस़ जगनाथन यांनी सांगितले़ संघटनात्मक पद्धतीने केली जाणारी दुचाकी व चेनस्रॅचिंगमध्ये नवीन गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे उघड होत असून, गुन्ह्याच्या तपासासाठी एका विशेष पथकाची निर्मितीकरण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले़ सोमवारी पोलीस आयुक्तालयात पत्रकारांशी संवाद साधताना जगनाथन म्हणाले की, प्रत्येक गुन्ह्याला दोन बाजू असून, शरीराविरुद्धचे गुन्हे नियंत्रणात आणणे शक्य नाही़ मात्र इतर गुन्हे रोखून शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही आमची प्रमुख जबाबदारी आहे़ त्यादृष्टीने पोलिसांनी आपले कामदेखील सुरू केले आहे़ चेनस्नॅचिंग व दुचाकी चोरी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांच्या विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे़ नाकाबंदी व पेट्रोलिंग करून चेनस्ॅनचिंग व दुचाकीचोरीवर नियंत्रण मिळविता येणार नाही़ याचे प्रमुख कारण म्हणजे गुन्हेगार संघटनात्मक पद्धतीने हे गुन्हे करीत असून, यामध्ये नवीन गुन्हेगारांचाही समावेश आहे़ त्यामुळे शहरातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपापल्या हद्दीतील सराईत गुन्हेगारांबरोबरच नवीन गुन्हेगारांची यादी तयार करण्यास सांगण्यात आले आहे़ वाडीवऱ्हे व येवल्यासारखी लुटीची घटना घडू नये यासाठी बँकांनी मागणी केल्यास त्यांना पोलीस संरक्षण दिले जाईल़राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची सदस्य असल्याचे सांगून शहरातील महागड्या हॉटेलमध्ये आठ दिवस मुक्काम करणाऱ्या मुंबईतील महिलेवर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ याबरोबरच केबीसी घोटाळ्याचा तपासही योग्यरितीने सुरू असल्याचे जगनाथन यांनी सांगितले़ (प्रतिनिधी)
चेनस्रॅचिंगमध्ये नवीन गुन्हेगारांचा सहभाग
By admin | Published: May 12, 2015 1:40 AM