आज ज्येष्ठ नागरिक दिनजागतिक महिला दिन, आरोग्य दिन, पर्यटन दिन, जलसाक्षरता दिन, रोटरी इंटरनॅशनल दिन, योग दिन असे विविध दिन जागतिक पातळीवर संपन्न होतात. त्याचप्रमाणे दि. १ आॅक्टोबर रोजी जगभरात ज्येष्ठ नागरिक दिन पाळण्याची प्रथा बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. भारतात अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महामंडळ (आइस्कॉन) व महाराष्ट्रात महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेस्कॉम) या ज्येष्ठांच्या संस्थांतर्फे विविध ठिकाणी ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे व उपक्रमांचे आयोजन होत असते. १२ डिसेंबर १९८० रोजी डोंबिवली येथे महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाची स्थापना झाली तर २८ डिसेंबर २००१ मध्ये अखिल भारतीय ज्येष्ठ नागरिक महामंडळाची स्थापना झाली. महाराष्ट्रात विविध शहरांत व विशेषत: ग्रामीण भागातही ज्येष्ठांचे संघ सध्याच्या काळात कार्यप्रवण आहेत. जागतिक ज्येष्ठ दिनानिमित्त महाराष्ट्रातील महासंघाच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊ या !फेडरेशन आॅफ सिनिअर सिटिझन आॅर्गनायजेशन आॅफ महाराष्ट्र संक्षिप्त स्वरूपात फेस्कॉमच्या निर्मितीला सुमारे ३६ वर्षे होऊन महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांत ज्येष्ठ नागरिकांचे संघ अधिकाधिक जोमाने कार्य करीत आहेत. अन्य संस्थांप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव असे ९ पदाधिकारी, प्रादेशिक विभागीय पदाधिकारी अध्यक्ष व सचिव काही पदसिद्ध स्वीकृत व निमंत्रित सदस्यांचे हे नियामक मंडळ महाराष्ट्र ज्येष्ठ संघाचे व्यवस्थापन करीत असते.व्यवस्थापनाच्या दृष्टीने मुंबई, कोकण, नगर, नाशिक, पुणे, खान्देश, कोल्हापूर, उत्तर मराठवाडा, दक्षिण मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ असे दहा विभागीय अध्यक्ष व सचिव नियामक मंडळावर, संबंधित विभागाचे प्रतिनिधित्व करीत असतात. आपल्या नाशिक-नगर विभागातून अध्यक्ष उत्तमराव तांबे व सचिव के. पी. भालेराव गेली ६ वर्षे महामंडळावर उत्तम कार्य व प्रतिनिधित्व करीत आहेत.ज्येष्ठ नागरिक चळवळीस बळ देणारे मुखपत्र म्हणजे ‘मनोहारी मनोयुवा’ होय. ‘वयोवृद्ध: मनोयुवा’ हे मनोयुवाचे घोषवाक्य आहे. १९९३ पासून हे द्वैमासिक संपूर्ण महाराष्ट्रासाठी सध्या कोल्हापूर येथून प्रसिद्ध होत असते. ज्येष्ठांचे अनुभव, कथा, कविता, अभिनंदनीय, संपादकीय, अध्यक्ष उवाच, मला काही सांगावयाचे आहे, सहली, संस्थावार्ता, शासकीय पत्रके, अधिवेशने, आधारस्तंभ फोटो व माहिती असे विविध उपक्रम ज्येष्ठांपर्यंत मनोयुवातून जात असतात. प्रारंभी काळात मुंबई, नाशिक, औरंगाबाद व सध्या कोल्हापूर येथून प्रसिद्धी होत असे.महासंघाच्या प्रथेनुसार ८ मार्च महिला दिन, ४ जून पर्यावरण दिन, १२ डिसेंबर महासंघ स्थापना दिन, २८ डिसेंबर महामंडळ दिन, १५ आॅगस्ट, २६ जानेवारी, १ मे महाराष्ट्र दिन असे विविध दिनी ज्येष्ठांचे मेळावे व उपक्रम होतात. विविध कार्यक्रमांतून ज्येष्ठ जागृतीचे कार्य चालते. प्रति २ वर्षांनी फेस्कॉम महासंघाचे अधिवेशन व प्रतिवर्षी महामंडळ आइस्कॉनतर्फे अधिवेशन आयोजित होत असते. अशा अधिवेशनातून अनुभव, ज्ञान, जिज्ञासा, काम करण्याची उमेद, नवे मित्र जोडण्याची संधी, प्रेक्षणीय स्थलदर्शन, विचारांचे आदान, प्रदान, नवी ऊर्जा मिळाल्याचा आनंद ज्येष्ठांना मिळत असतो.( रमेश देशमुख - माजी संपर्क सचिव, महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ)
एक नवी ऊर्जा
By admin | Published: October 01, 2016 12:51 AM