जादूगार रघुवीर यांचे नातू जितेंद्र रघुवीर यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी त्यांच्या आठ दशकांच्या परंपरेसह आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन तयार केलेल्या जादूंची महती विशद करुन या क्षेत्राकडे वळण्यामागील कारण सांगितले. जादूगार रघुवीर हे त्यांचे आजोबा तर विजय रघुवीर हे त्यांचे वडील. त्यामुळे त्यांच्या घराला ८० वर्षांपासूनची जादूची परंपरा आहे. त्यांनी भारतात मेकॅनिकलमधून बीई तर अमेरिकेतून एमएस पूर्ण करुन भारतात परतल्यावर पदवीदेखील मिळवली. त्यानंतर टाटा कंपनीत ते काही वर्ष प्रॉडक्शनला विभागप्रमुख म्हणूनही काम केले. त्यानंतर नोकरीचा राजीनामा देऊन ते पूर्णवेळ जादूच्या प्रयोगांकडे वळले. जुन्या काळातील जादू केवळ हातचलाखी नव्हत्या, त्यातदेखील विज्ञान होते. मात्र, आता नव्याने करण्यात येणाऱ्या अनेक जादुंमध्ये मॅथ्स, फिजिक्स, जॉमेंट्री या विविध विषयांतील सूत्रांवर आधारितही जादू असतात, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या प्रयोगात प्रेक्षागृहातील मुलगी हवेत अधांतरी, नोटांचा पाऊस, स्टेजवरील माणूस क्षणार्धात गायब, मान कापण्याचे तसेच हात कापले जाण्याचे मशीन आणि हात पूर्ववत, सावलीपासून माणसाची निर्मिती अशा बहुतांश जादू या कोणत्या ना कोणत्या विज्ञानावर आधारीत असतात. जादूचे प्रयोग करण्यासाठी ते आतापर्यंत २७ देश फिरल्याने काही नावीन्यपूर्ण शिकण्याबराेबरच काही नवीन शोधून काढण्याचाही त्यांचा प्रयत्न असतो. कोरोना काळात घरी असल्याने त्या काळात त्यांनी रिंग ओ मॅजिकचा आधुनिक आविष्कार, मायक्रोवेव्ह मॅजिक, स्वॉर्ड कॅबिनेट, माणसाचे दोन तुकडे करुन पुन्हा जोडणे अशा काही अभिनव जादूदेखील आत्मसात केल्याचे नमूद केले.
फोटो
१८रघुवीर जितेंद्र