मालेगाव : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना मालेगावातील काँग्रेस अध्यक्ष निवडीबाबत निष्ठावंतांच्या बैठकीचा अहवाल सादर केला जाईल व लवकरच मालेगाव काँग्रेस अध्यक्ष जाहीर होईल. दखनी मोमीन वाद करू नका. संघटनेतील पदांवर नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल, असे प्रतिपादन पक्षनिरीक्षक सय्यद मुजफ्फर हुसेन यांनी केले.
मालेगावी किदवाई रोडवरील शहर काँग्रेस कमिटीत काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी पक्षनिरीक्षकांच्या उपस्थितीत ज्येष्ठ काँग्रेस नेते जमील क्रांती यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी सय्यद मुजफ्फर हुसेन बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश जनरल सेक्रेटरी तारीक फारुकी, मधुकर शेलार, ज्ञानेश्वर गायकवाड, दिगंबर गिते, जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, प्रांतिक सदस्य प्रसाद हिरे, डॉ, मंजूर अय्युबी, काँग्रेस अध्यक्ष पदाचे दावेदार एजाज बेग, मुनव्वर सुलताना, महिला शहराध्यक्ष अनिता अवस्थी आदी उपस्थित होते.
सय्यद मुजफ्फर हुसेन म्हणाले, पक्ष विचारपूर्वक निर्णय घेईल. दखनी मोमीन वाद करू नका, आपापसातील सर्व भेद विसरून आगामी मनपासह येणाऱ्या सर्व निवडणुकांना सामोरे जा. यापूर्वीदेखील अनेकदा पक्ष अशा प्रसंगांना सामोरा गेला आहे. संघटनेतील पदांवर नव्या चेहऱ्यांना काम करण्याची संधी मिळेल. पक्ष पुन्हा उभारी घेईल. ज्यांनी कॉंग्रेसला आपली मालमत्ता समजली अशांना संपताना पाहिले असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी डॉ. मंजूर अय्युबी, जमील, क्रांती, प्रसाद हिरे, एजाज बेग, शरद आहेर, जैनुलआब्दिन पठाण यांची भाषणे झाली.