नाशिक : भंडारा येथील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातील नवजात बालक कक्षातील अग्निशमन यंत्रणेची तपासणी केली असता आऊटडेटेड आढळून आलेली फायर एक्स्टिंग्विशर सिलिंडर बदलून तिथे नवीन ठेवण्यात आली. मनपाच्या अग्निशमन दलाकडून प्रलंबित असलेला फायर ऑडिट रिपोर्ट लवकर मिळवण्यासाठी सोमवारपासून फॉलोअप घेतला जाणार आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्व रुग्णालयांमधील यंत्रणादेखील सजग झाली आहे. सर्व हॉस्पिटल्सचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातही फायर ऑडिट करून घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातील वायरिंगचे कामदेखील नुकतेच करून घेण्यात आले असले तरी त्याबाबतदेखील फेरतपासणी करून घेण्यात येणार आहे. त्याशिवाय जिल्ह्यातील अठरा ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांचेदेखील दोन वर्षांपासून ऑडिट करण्यात आलेले नसल्याने त्यांच्या ऑडिटलादेखील प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच सर्व शासकीय, निमशासकीय रुग्णालयातील सर्व प्रकारची सुरक्षा यंत्रणा सज्ज करण्यात येणार आहेत. त्याशिवाय अन्य सुरक्षाविषयक उपकरणे, इलेक्ट्रिकल उपकरणे तसेच अग्नीशमन यंत्रणेची माहिती आणि प्रशिक्षण देण्यालाही जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुढाकार घेण्यात येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
फोटो
०९ नवजात बालक कक्षात बसवलेले नवीन फायर एक्स्टिंग्विशर.