शहरात गणेशोत्सवाच्या तोंडावर घरफोड्या, सोनसाखळी चोरी, वाहनचोरी, हाणामारीसारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे म्हसरुळ, पंचवटी, भद्रकाली, मुंबईनाका, गंगापूर, इंदिरानगर, उपनगर, नाशिक रोड या पोलीस ठाण्यांना नवे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लाभले आहेत. तसेच सायबर पोलीस ठाण्याचा कारभारदेखील नव्या हातात सोपविण्यात आला आहे. यासह गुन्हे शाखा युनिटमध्येही खांदेपालट झाली असून, शहर वाहतूक शाखेतही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या सर्व पोलीस ठाण्यांच्या नव्या पोलीस प्रमुखांपुढे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारीला पायबंद घालण्याचे मोठे आव्हान उभे आहे. अंबड, सातपूर, देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना आयुक्तालयाकडून मुदतवाढ दिली गेली आहे. अंबड, सातपूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतदेखील गुन्हेगारी वाढत असून खून, जबरी लूट, हाणामाऱ्या, घरफोड्यांसारखे गुन्हे सर्रासपणे घडत असून, हे गुन्हे रोखण्यासाठी येथील पोलीस प्रमुखांना ठोस पावले उचलावी लागणार आहेत.
एकूणच सणासुदीच्या काळात शहरात कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आणि जनतेमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास वाढविण्याकरिता आयुक्तालयाच्या परिमंडळ-१ व २च्या उपायुक्तांपासून तर सहायक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना आपआपसांमधील मतभेद बाजूला सारत हेवेदावे विसरून एकत्रितपणे प्रयत्न करीत गुन्हेगारांवरील ‘खाकी’चा वचक अधिक बळकट करावा लागणार आहे.
- अझहर शेख, नाशिक