नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीसाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविक व साधू-महंतांच्या आरोग्यसेवेसाठी शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्हा रुग्णालयात २०० बेडची सुसज्ज इमारत तयार केली आहे़ या इमारतीमध्ये गत महिनाभरात तब्बल २१८ साधू-महंतांना आरोग्यसेवा देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एकनाथ माले यांनी दिली आहे़जिल्हा रुग्णालयात केवळ नाशिक जिल्ह्यातूनच नव्हे तर आजूबाजूच्या जिल्ह्यातून तसेच विभागातूनही रुग्ण दाखल होतात़ त्यातच सिंहस्थ पर्वणी असल्यामुळे तसेच आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासनाने खास सिंहस्थासाठी जिल्हा रुग्णालयात २०० बेडचे सुसज्ज इमारत तयार केली़ या इमारतीचा ताबा २२ आॅगस्टला जिल्हा रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आला़ पर्वणी कालावधीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या संपूर्ण इमारतीतील बेड्स, यंत्रसामुग्री, आॅपरेशन थिएटर, कर्मचारी वर्ग, औषधसाठी सज्ज ठेवण्यात आला होता़जिल्हा रुग्णालयाला २२ आॅगस्टला या इमारतीचा ताबा मिळाला़ २२ आॅगस्ट ते १९ सप्टेंबरपर्यंत २१८ साधू-महंतांवर या ठिकाणी उपचार करण्यात आले़ त्यापैकी १५७ साधू उपचारानंतर ठणठणीत बरे झाले, तर सहा जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आली़ उपचार घेणाऱ्या तीन साधूंचा मृत्यू झाला असून, त्यापैकी एकास स्वाइन फ्लू झाल्याचे समोर आले आहे, तर आठ साधूंना दुसऱ्या रुग्णालयात पाठविण्यात आले़ सद्यस्थितीत १२ साधूंवर उपचार सुरू आहेत़ (प्रतिनिधी)
नवीन रुग्णालयही ठरले भाविकांसाठी वरदान
By admin | Published: September 20, 2015 11:45 PM