नाशिकरोड : केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी झालेल्या बैठकीत मुद्रणालय महामंडळाने मंजूर केलेल्या दोन्ही मुद्रणालयांतील मशीनरी या लवकरात लवकर बसवून द्याव्यात, अशी मागणी मजदूर संघाच्या वतीने करण्यात आली. केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला हे शनिवारी नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी सायंकाळी जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयास भेट देऊन नोटा छपाई व इतर कामांची पाहणी केली. यावेळी शुक्ला यांच्यासमवेत खासदार हेमंत गोडसे, चलार्थपत्र मुद्रणालयाचे प्रभारी महाप्रबंधक मनीष शंकर, भारत प्रतिभूती मुद्रणालयाचे महाप्रबंधक सुधीर साहू व मजदूर संघाच्या पदाधिकाºयांची संयुक्त बैठक झाली. बैठकीमध्ये मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी शुक्ला यांच्याकडे चलार्थपत्र मुद्रणालयात १९८० च्या काळातील मशिनरी असून नवीन मशिनरी लवकरात लवकर बसवून देण्याची मागणी केली. सायमंटन आॅक्साइड प्रिंटिंग मशीन, इंटग्लो मशीन, कटपॅट व नंबरिंग मशीन यांना मुद्रणालय महामंडळाकडून बसविण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे. पुढील कारवाई लवकरात लवकर करून सीएनपीमध्ये नवीन मशिनरी बसवून द्याव्यात, अतिरिक्त दोन इंटग्लो उपलब्ध करून दिल्यास नोटा छपाईस मोठी मदत होईल व इतर मशीनची ओव्हरआॅइलिंग करून द्यावी, अशी मागणी गोडसे व जुंद्रे यांनी केली. नोटा छपाई रंग तपासणी ही कामगारांकडून केली जाते. त्याकरिता आॅनलाइन, आॅफलाइन कलर इन्स्पॅक्शन सिस्टीम मशीन दिल्यास एका सीटमध्ये ५० नोटा व एका रीममध्ये ५०० सीटची तपासणी सहजरित्या करता येईल. नोटा छपाईसाठी कागद आयात करावा लागत आहे. या ठिकाणी पेपर प्लांटसाठी जागा, पाणी व इतर सर्व सुविधा उपलब्ध असल्याने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा, अशी मागणी जुंद्रे व गोडसे यांनी केली. बैठकीला माधवराव लहामगे, सुनील आहिरे, राजेश टाकेकर, नंदू पाळदे, उत्तम रकिबे, शिवाजी कदम, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे, रमेश खुळे, दिनकर खर्जुल, इरफान शेख, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, उल्हास भालेराव आदि उपस्थित होते.पासपोर्ट छपाई, इन-ले मशीन बसविण्याची मागणीसंपूर्ण देशामध्ये भारत प्रतिभूती मुद्रणालयातच पासपोर्टची छपाई केली जाते. त्याकरिता नवीन पासपोर्ट मशीन मंजूर असून, ते तातडीने बसवून देण्यात यावे. ई-पासपोर्ट छपाई भविष्यात सुरू करावी लागणार असल्याने त्याकरिता त्या पासपोर्टमध्ये बसविण्यात येणारी इन-ले चीप मशीनदेखील बसविण्यात यावी. तसेच मद्याच्या बाटलीचे सील बनविण्याचे काम आयएसपीमध्ये सुरू असून, त्याकरिता एक्साइज सील व एक शीट कलर मशीन बसवून द्यावे, अशी मागणी शुक्ला यांच्याकडे करण्यात आली. एमआयसीआर ही धनादेश छपाई करणारी मशीन बसविण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. यावेळी शुक्ला यांनी मंजुरी मशीनरी वेळेस बसवून देण्यात येईल असे स्पष्ट केले.
दोन्ही मुद्रणालयांत नवीन मशीनरी बसवावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 12:36 AM