नाशिक : नवे पद मिळाले की, नव्या संकल्पना असतात. तथापि, यंदा महापौरपदाची निवडणूक झाली आणि लगेचच आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे नवे महापौर अशोक मुर्तडक यांनी कोणतीही नवी घोषणा करण्याचे टाळले आहे. तथापि, सुटीच्या दिवशी विविध भागांना, उद्यानांना भेटी देऊन नागरिकांशी थेट संपर्क साधण्याचा मनोदय त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.नाशिकच्या चौदाव्या महापौरपदी मनसेचे अशोक मुर्तडक निवडून आले खरे; परंतु त्याच दिवसापासून विधानसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे लगेचच काही नवीन कामे सुरू करता आलेली नाहीत. तथापि, छोट्या छोट्या कामांपासून सुरुवात करण्याची तयारी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. महापालिकेसमोर मोठी आव्हाने आहेत. कुंभमेळा होऊ घातला आहे. त्यामुळे हा कुंभमेळा चांगल्या पद्धतीने पार पडावा ही इच्छा आहे. तसेच राज ठाकरे यांच्या शहर सुधारण्याच्या या कल्पना आहेत, त्यांना गती देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. अर्थात, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट त्यांच्याशीच संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. औद्योगिक क्षेत्रात शनिवारी, तर अन्य कार्यालयांना सामान्यत: रविवारी सुटी असते. अशा दिवशी नागरिक परिसरातील उद्यानांत किंवा विविध उपक्रमांसाठी पालिकेच्या वास्तुत येतात. त्या पार्श्वभूमीवर तेथेच त्यांना भेटून काय अडी-अडचणी आहेत, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ अधिकाऱ्यांना सूचना देऊन ती कामे किमान आठ दिवसांत मार्गी लागली पाहिजे, असा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नवे महापौर आता भेटणार चौकाचौकांत
By admin | Published: September 14, 2014 12:41 AM