येवला : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी, (दि. ६) अमावास्येलाही शेतमालाचे लिलाव झाल्याने अमावास्येला बाजार बंद ठेवण्याची ६४ वर्षांची परंपरा खंडित झाली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांची शेतमाल विक्रीची अडचण दूर झाली आहे.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेवरून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार यांनी बाजार समितीतील सर्व परवानाधारक खरेदीदार व्यापाऱ्यांची बैठक घेतली. यात शेतकरी बांधवांच्या अनेक दिवसांच्या मागणीचा विचार करून मागील ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढून प्रत्येक अमावास्येला शेतमाल लिलाव चालू ठेवण्याबाबत निर्णय घेतला होता.
त्यानुसार सोमवारी, (दि. ६) रोजी अमावास्येला पोळा सणाच्या मुहूर्तावर कांदा व भुसार धान्य लिलावाचा शुभारंभ भुजबळ संपर्क कार्यालयाचे प्रमुख बाळासाहेब लोखंडे, बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंतराव पवार यांच्या हस्ते येवला आवारावर, तर अंदरसूल उपबाजार येथे प्रशासक किसनराव धनगे, मकरंद सोनवणे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य आवारात लिलावातील प्रथम शेतकरी विष्णू भीमाजी चव्हाण तर उपबाजार अंदरसूल येथे शेतकरी ठकुनाथ खैरनार यांचा शाल व श्रीफळ देऊन बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. बाजार समितीच्या या निर्णयाने शेतकरी बांधवांची अमावास्येच्या दिवशी शेतमाल विक्रीची अडचण दूर झाली आहे.
याप्रसंगी बाजार समितीचे विश्वासराव आहेर, साहेबराव आहेर, मधुकर साळवे, ॲड. समीर देशमुख, ज्ञानेश्वर दराडे, शरद शिंदे, मायावती पगारे, प्रेमलता आट्टल, सुवर्णा सोनवणे, राजेंद्र शेलार, बाळासाहेब आवारे, जयाजी शिंदे, गणपत भवर, चंद्रकांत शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
फोटो : ०६ येवला बाजार
येवला बाजार समिती आवारावर अमावास्येला लिलाव शुभारंभप्रसंगी प्रथम शेतकरी विष्णू भीमाजी चव्हाण यांचा सत्कार करताना बाळासाहेब लोखंडे, मुख्य प्रशासक वसंत पवार. समवेत व्यापारी व शेतकरी.
060921\06nsk_36_06092021_13.jpg
फोटो : ०६ येवला बाजार