कमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यातील मालेगाव येथे दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून, त्यामानाने त्याला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता यांसह सुमारे सहाशेहून अधिक आरोग्य कर्मचारी, अधिकाऱ्यांची पदे भरण्याचा प्रस्ताव आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच सदरचे पदे तातडीने भरण्याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी या भरतीला हिरवा कंदील दर्शविला आहे.
मालेगाव शहरात कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता त्याला तोंड देण्यासाठी मालेगाव महापालिकेची आरोग्य सेवा अपुरी पडत आहे, त्याचबरोबर मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रयत्नही तोकडे ठरत असल्याने दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. मालेगावची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे ४० अधिकारी, कर्मचाºयांची सेवा वर्ग करून त्यांच्याकडे आरोग्य सर्व्हेचे काम सोपविण्यात आले आहे. मात्र असे असतानाही अपुºया मनुष्यबळाच्या आधारे कोरोनाचा नायनाट करणे अशक्य असल्याची बाब दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत स्पष्ट करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी मालेगावी वर्ग केले, तर ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडून पडणार असल्याची भीती यावेळी व्यक्त करण्यात आल्याने राष्टÑीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यासाठी आवश्यक असलेली पदे कंत्राटी पद्धतीने भरल्यास आरोग्य व्यवस्थेला मोठा हातभार लागण्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांनी भुजबळ यांच्या कानी घातले. त्यांनी तातडीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हिरवा कंदील दर्शविला. त्यानुसार जिल्हा परिषदेने आपला प्रस्ताव तयार केला असून, आरोग्य उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत ही पदे भरण्याची विनंती करण्यात आली आहे.नवीन भरतीमध्ये हॉस्पिटल इंचार्ज, वैद्यकीय अधिकारी, नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, एक्स-रे तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, वॉर्डबॉय यांच्यासह रुग्णालयांना लागणारे सर्व अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश आहे. प्रारंभी आरोग्य उपसंचालक कार्यालयाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी भरतीची जाहिरात काढली होती. त्यात होणारा कालापव्यय लक्षात घेता मालेगावसाठी स्वतंत्र भरती करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.