उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल कांद्याच्या आवकेत हळुहळू वाढ होत असून बाजारभावातही सुधारणा होत आहे. या नवीन लाल कांद्यांना काल सोमवारी सर्वोच्च ३०००रुपये बाजारभाव मिळाला होता. परंतु एकाच दिवसात म्हणजे मंगळवार ( दि.१६ ) रोजी ८०० रुपयांनी वाढ होत सर्वोच्च ३ हजार ८०० रुपयांनी विक्री झाला आहे. दुसरीकडे उन्हाळी कांद्यांच्या दरात घसरण सुरूच आहे. दरवर्षी दसरा व दिवाळीला मोठ्या प्रमाणात आवक होणाऱ्या नवीन लाल पावसाळी कांद्यांना चालू वर्षी अतिपावसामुळे फटका बसला असून सुरुवातीला लागवडीसाठी टाकलेली रोपे खराब झाल्याने पुन्हा दुसऱ्या टप्प्यात रोपे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. परिणामी नव्याने टाकलेली रोपे उशिरा लागवडीला आली. लागवडीनंतरही झालेल्या पावसामुळे कांदा पिकावर विविध रोगांचा परिणाम होऊन विपरीत परिणाम झाल्याने चालृ वर्षी हा नवीन लाल कांद्याला बाजारात विक्रीस येण्यास एक ते दीड महिना उशीर झाला आहे. सद्यस्थितीत परिस्थितीवर मात करत काही शेतकऱ्यांनी लाल कांदा पिकविला परंतु पाहिजे त्या प्रमाणात उत्पादन निघत नसल्याने लाल कांद्यांची आवक जेमतेच होत असून या कांद्यांना मागणी वाढल्याने बाजारभावात वाढ झाल्याचे कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी सांगितले. बाजार आवारात १५० वाहनांमधून सुमारे २००० क्विंटल आवक झाल्याचा अंदाज असून बाजारभाव कमीत कमी १००१ रुपये, जास्तीत जास्त ३,८०० रुपये तर सरासरी २८०० रुपये दराने विक्री झाला. दरम्यान उन्हाळी कांद्यांची मागणी घटल्याने बाजारभाव घसरण सुरूच असून या कांद्यांना कमीत कमी ७०० रुपये, जास्तीत जास्त २३८० रुपये तर सरासरी १५०० रुपये दराने विक्री झाली.
---------------------
एक एकर नवीन लाल कांदा लागवडीसाठी दोन वेळा रोपे टाकली. कशीबशी लागवड केली मात्र कांदा पिकावर रोगाने थैमान घातले. महागड्या औषधांची फवारणी करुन कांदा पीक वाचविले. सद्यस्थितीत एक एकरातून सात ते आठ क्विंटल कांद्यांचे उत्पादन आले. सद्यस्थितीत मिळत असलेला तीन हजार रुपये बाजारभाव बघता कांदा उत्पादनापासून मिळणारा नफा तर दूरच परंतु केलेला खर्चही निघणार नाही.
- भरत देवरे, शेतकरी
---------
लाल कांद्याना अद्याप देशांतर्गत मागणी नसली तरी जुना उन्हाळी कांद्यापेक्षा नवीन लाल कांदा स्थानिक किरकोळ बाजारात अधिक विक्री होत असल्याने लाल कांदा दरात वाढ झाली आहे.
- संदेश बाफणा, कांदा व्यापारी