नाशिक : घंटागाडीच्या ठेक्याची मुदत ७ जानेवारीला संपुष्टात आल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून संबंधित ठेकेदारांना पुन्हा एकदा चार महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव गुरुवारी (दि.१४) होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेत ठेवला जाणार आहे. मात्र, आधी महासभेने दिलेल्या निर्णयानुसार पाच वर्षांसाठी घंटागाडीच्या ठेक्याची निविदाप्रक्रिया सुरू करावी मगच मुदतवाढ देण्याचा पवित्रा स्थायी समितीने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. घंटागाडीच्या ठेक्याचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून गाजतो आहे. महासभेने पाच वर्षांसाठी घंटागाडीचा ठेका देण्याचा निर्णय घेतला; परंतु शासनाच्या हस्तक्षेपामुळे महापालिका प्रशासनाला निविदाप्रक्रिया थांबविणे भाग पडले. त्यामुळे घंटागाडीचा नव्याने ठेका देण्याचा प्रस्ताव प्रलंबित असतानाच सद्यस्थितीतील चारही ठेकेदारांची मुदत दि. ७ जानेवारीलाच संपुष्टात आलेली आहे. त्यामुळे घंटागाडीच्या ठेक्याबाबत प्रशासनापुढे पेच निर्माण झाला आहे. दि. ८ जानेवारीला झालेल्या स्थायीच्या सभेतच प्रशासनाने पुन्हा एकदा मुदतवाढीचा विषय जादा विषयात आणला होता. परंतु सभा तहकूब झाल्याने प्रशासनाची कोंडी झाली होती. नव्याने राबविण्यात येणाऱ्या ठेक्याच्या निविदा प्रक्रियेबाबत निर्णय होईपर्यंत संबंधित ठेकेदारांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याची विनंती प्रशासनाकडून स्थायीच्या सभापतींना करण्यात आली; परंतु सभापतींनी पुन्हा पुन्हा मुदतवाढ न देण्याच्या निर्णयावर आपण ठाम असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, स्थायीने आता आधी नव्याने काढण्यात येणाऱ्या ठेक्याची निविदाप्रक्रिया सुरू करावी मगच सद्यस्थितीतील ठेकेदारांना मुदतवाढ देण्याचा पवित्रा घेतल्याने प्रशासनाने तशी प्रक्रिया राबविण्याबाबत हालचाली सुरू केल्याचे समजते. (प्रतिनिधी)
आधी नवी निविदा, मगच मुदतवाढ
By admin | Published: January 14, 2016 12:17 AM