ओझर : ओझर जिल्हा परिषदेचे माजी अपक्ष सदस्य यतीन कदम यांनी बुधवारी (दि.७) मुंबईत भाजपात प्रवेश केला. यामुळे निफाडच्या राजकीय प्रवाहात नवा ट्विस्ट आला असून आगामी काळात या ठिकाणी शिवसेना-भाजपा असा सामना रंगण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
ओझर ग्रामपंचायतीचे नुकतेच नगरपरिषदमध्ये रूपांतरित झाल्यामुळे आगामी काळात राजकारणातील सामना रंगणार आहे. अपक्ष राहून भवितव्य घडणार नसल्याचे लक्षात येताच राजकीय पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणे अनिवार्य झाल्याने अखेर यतीन कदम यांनी जय श्रीरामचा शंखनिनाद केला. दिवंगत आमदार रावसाहेब कदम, माजी आमदार मंदाकिनी कदम यांचे यतीन हे सुपुत्र आहेत. सुरुवातीला शिवसेनेत, नंतर मनसे व आता भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. २००७ साली त्यांनी पंचायत समिती तर २००९ मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यात त्यांना अपयश आले. त्यानंतर चुलत बंधू अनिल कदम यांच्याशी जुळवून घेत २०१४ च्या निवडणुकीत त्यांना पाठिंबा दिला. ओझर ग्रामपंचायतमध्ये आपल्या वडिलांनी गावातील एकनिष्ठ व्यापाऱ्यांना एकत्र करत स्थापन केलेल्या नागरिक आघाडीचे त्यांनी नेतृत्व केले. त्यात त्यांना स्थानिक स्वराज संस्थेत दोन वेळेला यश आले. मागील वर्षीपर्यंत एकत्र असलेल्या युतीत आता थेट सामना होतो की आणखी काही समीकरणे बदलतात, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून असणार आहे.
इन्फो
पक्षापेक्षा अपक्ष अधिक धार्जिणे
यतीन कदम यांनी मनसेपासून सुरू केलेल्या पक्षीय राजकारणाचा विचार करता त्यांना अपक्ष म्हणूनच निवडणूक मैदानात यश लाभलेले आहे. अशातच त्यांनी भाजप हा पर्याय स्वीकारला आहे. युतीमुळे शिवसेनेला निफाड सुटत होता. राज्यात समीकरण बदलल्याने भाजपने आता संघटनात्मक बळ वाढवण्यावर जोर दिला आहे. दिलीप बनकर, अनिल कदम यांचे गट मोठे आहेत. भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरेशबाबा पाटील हेवीवेट समजले जातात. त्यांचा अनिल कदम यांच्याशी असलेला स्नेह जगजाहीर आहे. अनेक ठिकाणी गावपातळीवर संघाचे काम करणारे कार्यकर्ते पुरोगामित्व धोरण स्वीकारतात. त्यामुळे भाजपच्या सर्व गटांना एकत्र घेऊन काम करण्याची किमया यतीन कदमांना साधावी लागणार आहे.
फोटो - ०७ यतिन कदम-१
भाजपात प्रवेश करताना यतीन कदम, समवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.
070721\07nsk_23_07072021_13.jpg
फोटो - ०७ यतिन कदमभाजपात प्रवेश करताना यतीन कदम, समवेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील,विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस.