नाशिक : महापालिकेत सत्तापदी येऊन सात महिने लोटल्यानंतर स्थायी समिती सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेत्यासह अकरा पदाधिकाºयांना नवीन वाहनसौख्य लाभणार असून स्थायी समितीच्या सोमवारी (दि.९) झालेल्या सभेत वाहन खरेदीसाठी सुमारे ९० लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.महापालिकेत भाजपाने स्पष्ट बहुमत संपादन केल्यानंतर विविध समित्यांची रचना पूर्ण करण्यात आली. त्यात सहा प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांचाही समावेश आहे. सहापैकी चार सभापतींनी वाहनभत्ताऐवजी वाहन घेणे पसंत केले आहे. सद्यस्थितीत महापालिकेच्या यांत्रिक विभागाने सदर चारही प्रभाग सभापती व महिला बालकल्याणच्या सभापती यांना महापालिकेकडे उपलब्ध असलेले वाहन दिलेले आहे परंतु, चार प्रभाग सभापती, स्थायी समिती सभापती, महिला व बालकल्याण समिती सभापती, सभागृहनेता आणि नव्याने आरूढ होणाºया विधी, आरोग्य व शहर सुधार समित्यांच्या सभापतींकरिता नवीन वाहने खरेदी करण्याबाबत महापौरांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, प्रशासनाने चार प्रभाग सभापती, विधी, आरोग्य व शहर सुधार या तीन समित्यांचे सभापती आणि महिला बालकल्याण सभापती यांच्यासाठी स्विफ्ट डिझायर वाहन खरेदीचा प्रस्ताव महासभा व स्थायी समितीवर ठेवला होता. याशिवाय, स्थायी समिती सभापती व सभागृहनेता यांना सध्या वाहन उपलब्ध करून दिले असतानाही त्यांनी मारुती सियाझ वाहनाचा आग्रह धरल्याने त्यांच्यासाठीही वाहन खरेदी करण्याचा प्रस्ताव होता. सदरच्या प्रस्तावास महासभा व स्थायी समितीने घाईघाईने दि. २९ जून २०१७ रोजी मंजुरी दिली परंतु, दि. १ जुलैपासून जीएसटी लागू झाल्याने मारुती सियाझच्या किमतीत वाढ झाली आणि स्विफ्ट डिझायरच्या किमतीत घट झाली. त्यामुळे यांत्रिकी विभागाला पुन्हा नव्याने प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया राबवावी लागली. अखेर, स्थायीच्या बैठकीत ९० लाख रुपये खर्चाच्या ११ वाहनांच्या खरेदी प्रस्तावास मान्यता मिळाल्याने, येत्या काही दिवसांत नवीन वाहन पदाधिकाºयांच्या दिमतीला हजर होण्याची शक्यता आहे.
मनपा पदाधिकाºयांना लाभणार नवीन वाहनसौख्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 4:19 PM