संदीप झिरवाळ ।पंचवटी : नाशिकचा ग्रामोत्सव म्हणून ओळखल्या जाणाºया श्रीराम व गरुड रथयात्रेला अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. रथोत्सव समितीच्या वतीने रथोत्सव तयारी सुरू करण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेले श्रीराम रथाचे उजवे चाक सोमवारी (दि.५) शेकडो वर्षांनंतर बदलण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी श्रीराम रथाचे डावे चाक बदलण्यात आले होते. सांगली जिल्ह्यात हे रथाचे चाक बनविण्यात आले असून, गेल्या सहा महिन्यांपासून त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू होती. संपूर्ण बाभूळ या वृक्षाच्या लाकडापासून तयार करण्यात आलेल्या या चाकाचे वजन जवळपास ५०० किलोग्रॅम आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रथाच्या उजव्या चाकाचा घसारा झाल्याने चाक बदलले अत्यंत गरजेचे ठरले होते. सांगली येथील रफिकभाई शेख या मिस्तरीने यापूर्वी रथाचे काम केल्याने त्यांच्या हातूनच हे चाक घडविण्यात आले आहे. रथासाठी लागणारे नवीन लाकडी चाक बनविण्यासाठी येणारा सर्व खर्च हा पाथरवट समाजातील व रथोत्सव समितीच्या एका भाविकाने स्वयंस्फूर्तीने उचलला होता. नव्याने बसविण्यात आलेल्या श्रीराम रथाच्या उजव्या चाकासाठी सुमारे ७० हजार रु पयांचा खर्च आला आहे.
रामरथाला नवीन चाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 1:09 AM