संजय पाठकनाशिक- दिवाळी दरम्यान बंद पडलेल्या विमान सेवांमुळे नाराज झालेल्या नाशिककरांना आता विमान कंपन्यांनी न्यू इयर गिफ्ट दिले आहे. केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सुरु होऊन बंद पडलेल्या काही सेवा पुन्हा सुरू होणार असून इंडिगो या आघाडीच्या कंपनीनेदेखील नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
सध्या नाशिकच्या ओझर विमानतळावरून स्पाइस जेटच्या हैदराबाद आणि दिल्ली या दोनच विमान सेवा सुरू आहेत. आता या कंपनीने समर शेड्युलमध्ये अहमदाबाद-गोवा-बंगळुरू या आणखी तीन शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्याचबरोबर इंडिगो या महत्त्वाच्या विमान कंपनीने नागपूर- हैदराबाद गोवा आणि अहमदाबाद अशा चार शहरांसाठी सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. या कंपन्यांनी तसा प्रस्ताव डीजीसीएला सादर केला आहे. स्टार एअर या कंपनीने नाशिक-बेळगाव ही बंद केलेली विमान सेवा फेब्रुवारीपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बुकिंग सुरू झाले आहे.
नाशिकच्या ओझर विमान तळावरून विमानसेवा जोमाने सुरू असताना मध्यंतरी काही विमानसेवा बंद पडल्यामुळे नागरिकांची नाराजी होती. मात्र आता नाशिककरांना न्यू इयर गिफ्ट मिळाले आहे.