नाशिक : शहर व परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्यामुळे अनेकांनी शहराबाहेरील ग्रामीण भागात थर्टी फर्स्टच्या पार्टीचे बेत आखले; मात्र ग्रामीण पोलिसांनी देखील अशा भागांवर लक्ष केंद्रित केल्याने अनेकांचे बेत फसले. गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरच्या रस्त्यावरील गंगावऱ्हे-सावरगाव शिवारातील एका मल्टी क्यूसीन बारमध्ये सुरू असलेली हुक्का पार्टी शुक्रवारी (दि.३१) ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली.
नाशिक तालुका पोलीस ठाणे हद्दीत सावरगाव शिवारात ''गेट लॉस्ट'' नावाच्या मल्टी क्यूसीन रेस्टो-बारमध्ये अवैधरित्या हुक्का पार्लर चालविला जात होता. कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून याठिकाणी थर्टी फर्स्टनिमित्ताने हुक्का पार्टी रंगविली गेली होती. याबाबत उपमहानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांच्या विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली. पथकाने छापा टाकत धडक कारवाई केली. येथून पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ व मद्य जप्त करण्यात आले आहे.
कारवाईत मालक नामे संशयित कौस्तुभ रंजन विसपुते (२७ वर्षे रा.सराफ बाजार, नाशिक ), व्यवस्थापक सुरेंदर सिंग धामी 28, रा.नैनिताल, उत्तराखंड) बार कामगार कृष्णा रतन हमाल ( २३,रा. नेपाळ ) हुक्का पॉट तयार करणारा रोहित भारत पाळंदे (२३, रा.सातपूर) व हुक्का ओढणाऱ्या ४ ग्राहकांचा समावेश आहे.
पोलिसांनी या कारवाईत
तंबाखू युक्त फ्लेवरचे १४ पाकिटे, ८ हुक्का पॉट, इतर साहित्य व बीअरच्या ९ बाटल्या, मद्याच्या ३ असा ९ हजार ४५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने जप्त करुन वरील संशयित आरोपींविरुद्ध नाशिक तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आठवडाभरात शहराजवळील खेड्यात ही दुसरी हुक्का पार्टी शेखर-पाटील यांच्या पथकाने उधळून लावली आहे. यामुळे अशाप्रकारे अवैधरित्या मल्टी क्यूसीन बारमध्ये हुक्का पार्लर चालविणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. यापूर्वी चांदशी शिवारात कारवाई करण्यात आली होती