नाशिक : संपूर्ण विश्वाला सर्वार्थाने अत्यंत वाईट जात असलेले हे वर्ष एकदाचे लवकर संपू दे आणि नवीन वर्षापासून सारे काही सुरळीत व्हावे, अशा मानसिकतेत समस्त तरुणाई असल्याने यंदाच्या न्यू इअर पार्टीचे बेत आखण्यास आत्तापासूनच प्रारंभ झाला आहे. अर्थात, त्यातील काहींचा कल नेहमीप्रमाणे शहराच्या हद्दीबाहेरील हॉटेल्सकडे असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून अनेकांनी फार्महाऊसेस आणि शहराच्या परिघातील मित्रांच्या बंगल्यांसाठी बेत आखण्यास सुरुवात केली आहे.
२०२० वर्षाला अलविदा म्हणत नवीन वर्षाचे म्हणजेच २०२१ चे स्वागत करण्यासाठी १८ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या नववर्षाचे स्वागत धूमधडाक्यात करण्यासाठी सेलिब्रेशन करण्यासाठी मित्रमंडळींचे व्हॉट्सॲप ग्रुप रविवारपासून सक्रिय झाले आहेत. डिसेंबरच्या काहीशा कडाक्याच्या थंडीत एकत्रित जमण्याच्या दृष्टीने जागा आणि व्यवस्थेचे नियोजन सुरू झाले आहे. अशा या गेट टुगेदरसाठी मग कुणी कॉलेजचा ग्रुप, कुणी कार्यालयातील सहकाऱ्यांचा ग्रुप, तर कुणी शालेय मित्रमंडळी, कुणी कॉलनीतील मित्रांच्या ग्रुपवर कुठे जायचे, त्याचे बेत निश्चित होऊ लागले आहेत.
इन्फो
फार्महाऊस, गच्ची पार्टीचा ट्रेण्ड
गेल्यावर्षीपासून होम पार्टीचा ट्रेण्ड परत येतोय. त्यात यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गजबजणारी हॉटेल्स नकोच अशा मानसिकतेतही तरुणाई दिसून येत आहे. त्यामुळे एकतर फार्महाऊस किंवा गावाबाहेर घर, बंगला असणाऱ्यांच्या गच्चीत पार्टीचे बेतदेखील आखले जात आहेत. अशा न्यू इअर पार्टीसाठी बाहेरची जागा, हॉटेल किंवा हॉल बघण्याऐवजी स्वत:च्या टेरेसवर, फार्महाऊस आवारात पार्टी करण्याकडे अनेकांचा कल असल्याचे चित्र आहे.