नाशिक : त्या महिलेने गोंडस बालकाला जन्म दिला खरा, मात्र आनंदाचे वातावरण काही वेळातच विरले. नवजात अर्भकास श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यामुळे निदान केल्यानंतर त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. मात्र, अठरा दिवसांच्या उपचारानंतर या अर्भकाला कोरोनामुक्त करण्यात यश आले. नवजात अर्भकाची कोरोनावर मात हा देशभरातील बहुधा पहिला प्रकार असावा, असे येथील वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नाशिक शहरात कोराेना वाढत आहे; परंतु आता दुसऱ्या टप्प्यात लहान मुलांना देखील संसर्ग होत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे पालकांंमध्ये धाकधूक असणे स्वाभाविक आहे. परंतु अशावेळी योग्य उपचाराअंती कोरोनाच्या लढाईत बालकेही मात करू शकतात, असा विश्वास यानिमित्ताने निर्माण झाला आहे.
नाशिकच्या अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल येथे एका महिलेने एका २.७६० किग्रॅ. वजनाच्या एका गोंडस बालकाला जन्म दिला. त्या महिलेच्या कुटुंबात अतिशय आनंदाचे वातावरण झाले होते; मात्र जन्मानंतर काही तासांतच त्या अर्भकास श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होऊ लागला व बाळाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्यामुळे बाळाला ऑक्सिजनवर ठेवण्यात आले. बाळाच्या हृदयाची गती व रक्तदाब कमी झाल्याचे निदर्शनास आले. बाळाच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाची लक्षणे दिसून आली व बाळाच्या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत दोष असल्याचे निदर्शनास आले. त्यात बाळाचा एचआर सीटी स्कोअर १२ होता. त्यामुळे वैद्यकीय पथकाने कठीण आव्हान पेलले.
रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने या अर्भकावर लक्ष केंद्रित केले आणि अखेरीस बालकाने अठराव्या दिवशी कोरोनावर मात केली. रुग्णालयाचे संचालक तथा बालरोग तज्ज्ञ डॉ. सुशील पारख, डॉ. नेहा मुखी, डॉ. पूजा चाफळकर या पथकाच्या उपचारानंतर मातापित्यांनी बाळ सुखरूप घरी नेले आहे.
इन्फो...
गर्भवती महिलेची रोगप्रतिकारशक्ती कमी असते, त्यामुळे या महिलांनी अतिशय काटेकोरपणे कोविडपासून वाचण्याच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा व त्यामुळे बाळाला होणारा संभाव्य दुष्परिणाम टाळता येतो, असे आवाहन डॉ. सुशील पारख यांनी केले आहे.