नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधित संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, शुक्रवारी (दि.७) ८३७ नागरिक बाधित आढळून आले आहेत. मात्र, त्यातही दिलासादायक बाब म्हणजे १३८ नागरिक कोरोनामुक्त झाले असून, दिवसभरात एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झालेला नाही.
जिल्ह्यात शुक्रवारी आढळून आलेल्या बाधितांपैकी तब्बल ६२२ बाधित हे नाशिक शहरातील, १७३ नाशिक ग्रामीण, मालेगाव मनपा ५, तर जिल्हाबाह्य ३७ बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यातील बाधितांपैकी ७५ टक्के बाधित नाशिक शहरातील असल्याने महानगरात कोरोना वाढीचा वेग सध्या प्रचंड असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शहरवासीयांनी अधिक दक्षता घेण्याचे चित्र सध्या दिसून येत आहेत. नवीन रुग्णांच्या वाढत्या संख्येने शहरात उपचारार्थी रुग्णसंख्यादेखील अडीच हजाराचा टप्पा ओलांडत २५६६ वर पोहोचली आहे. त्यातदेखील नाशिक मनपाचे १९६९, नाशिक ग्रामीणचे ४९०, मालेगाव मनपाचे २३, तर जिल्ह्याबाहेरच्या ८४ रुग्णांचा त्यात समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्ततेचे प्रमाण ९७.२८ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यात नाशिक मनपाचे ९७.४५, नाशिक ग्रामीण आणि मालेगाव मनपाचे ९७.०१, तर जिल्हाबाह्य हे प्रमाण ९६.६१ टक्के आहे. दरम्यान, दिवसभरात एकाही बाधिताचा मृत्यू झाला नसल्याने बळींची संख्या ८७६३ वर कायम आहे.
इन्फो
प्रलंबित अहवाल साडेचार हजारांवर
जिल्ह्यात दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या आणि तुलनेने कमी प्रमाणात अहवाल प्राप्त होत असल्याने आतापर्यंतच्या प्रलंबित अहवालांची संख्या ४५२१ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक ग्रामीणचे ३५१६, नाशिक मनपाचे ९४४, मालेगाव मनपाचे ६१ अहवाल प्रलंबित आहेत. अहवाल मिळण्यास दोन दिवसांहून अधिक काळ लागत असल्याने तोपर्यंत संबंधित व्यक्ती बाजारात फिरल्यास अधिक प्रमाणात संसर्ग वाढण्याची शक्यता आहे.