नाशिक : प्रभाग क्रमांक १७ मध्ये काही दिवसांपूर्वी डांबरीकरण करण्यात आले असले तरी पावसाचे पाणी या रस्त्यावर साठत असल्याने येथील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे तक्रार केली आहे. घाईघाईत कामे उरकण्यात आल्यामुळे निकषानुसार डांबरीकरण झाले नसल्याचा नागरिकांचा आरेाप आहे. दरम्यान, आयुक्तांनी याप्रकरणी पाहणी करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते.
प्रभागातील हनुमंता नगर, रुक्मिणी नगर, लक्ष्मण नगर, सप्तश्रृंगीनरग, ओमनगर, पारिजात नगर, येथील रस्त्यांचे पाऊस सुरू असतानाच डांबरीकरण करण्यात आहे. या भागातील पावसाळी गटार योजनेतील पाईपलाईन नियमबाह्य व निकृष्ट असल्यानेच पाणी वाहून जात नसल्याने रस्त्यावर पाणी साठून राहत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे.
याप्रकरणी येथील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे कामाच्या दर्जाची तक्रार केली आहे. ठेकेदाराने मनमानी पद्धतीने भर पावसात डांबरीकरण केले असून आता रस्त्यांवर पाणी तुंबले आहे. याबाबतची तक्रार पोर्टलवर करूनही त्याची दखल घेण्यात न आल्याने डांबरीकरणाचा दुसरा थरही अशाच अवस्थेत देण्यात आला. त्यानंतर दुसऱ्यांदा तक्रार केल्यानंतर अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केली.
अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदाराला चेंबर दुरूस्तीबाबातच्या तसेच उंच करण्याबाबतच्या सूचना दिलेल्या असतांनाही चेंबरचे काम झालेले नाही. त्यामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
===Photopath===
220621\230822nsk_44_22062021_13.jpg
===Caption===
नव्याने डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर साचले पाणी