लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना राज्यातील मतदार यादीत सुमारे ४४ लाखांहून अधिक मतदारांची नावे सारखीच असल्याबद्दल महाराष्टÑ कॉँग्रेसने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली असून, या संदर्भात सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मतदार याद्यांची तपासणी करण्याचे व त्यातील दोष दूर करण्याचे आदेश दिले आहेत.
जानेवारी महिन्यात निवडणूक आयोगाने मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली असून, ती सर्वपक्षीयांना मतदार संघनिहाय अवलोकनासाठी ठेवण्यात आली आहे. या यादीवरच कॉँग्रेसने आक्षेप घेतला आहे. गेल्या आठवड्यात केंद्रीय निवडणूक आयोगाने मुंबईत दोन दिवस मुक्काम ठोकून सर्वच राजकीय पक्षांशी या संदर्भात संवाद साधला असता कॉँग्रेसने यादीतील त्रुटींवर भर दिला. या संदर्भात आयोगाला पुराव्यानिशी पत्र देण्यात आले आहे. त्यात ४४.६१ लाख मतदारांची नावे, नातेवाइकांचे नाव व लिंग समान असून, मुंबईत सुमारे ८.६९ लाख मतदारांची नावे समान आहेत. कॉँग्रेसच्या मते सदरची मतदार यादी सदोष असून, त्यात नसलेल्या मतदारांची नावे घुसडविण्यात आल्याचे म्हणणे आहे. आयोगाने या तक्रारीची दखल घेत सर्व अधिकाºयांना पत्र पाठवून कॉँग्रेसच्या तक्रारीच्या आधारे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या एकूणच कामकाजावर नापसंती व्यक्त केली आहे. मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदारांची खात्री करणे, छायाचित्र गोळा करणे, मतदारांच्या नावांची दुरुस्ती करणे अपेक्षित असताना मात्र मतदार यादीबाबत असलेले आक्षेप पाहता सदरची कार्यवाही अपेक्षेनुसार झाली नसल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा लवकरच होणार असून, तत्पूर्वी कॉँगे्रसने केलेल्या तक्रारींची दखल घेऊन बीएलओंमार्फत मतदारांची पुन्हा खात्री करण्यात यावी, अशा सूचना दिल्या आहेत.आयोगाने या संदर्भात दिलेल्या आदेशात मतदार यादीची पुन्हा खात्री करून दोष आढळल्यास सदर यादीची पुन्हा छपाई करण्यात यावी, दुय्यम मतदारांच्या छायाचित्रांची जुळणी करण्यात यावी, ज्या मतदारांच्या फोटोची जुळणी झाली नसेल अशा मतदारांच्या घरी जाऊन त्याची पडताळणी करण्यात यावी, दुय्यम नावे आढळून आल्यास त्या मतदाराकडून नमुना क्रमांक ७ भरून घेण्यात यावा व नावे वगळण्याची कार्यवाही करण्यात यावी. मतदार यादी तपासणीचा अहवाल दररोज आयोगाला सादर करण्यात यावा, असेही आयोगाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.