तालुक्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आढावा बैठक येथील शासकीय विश्रामगृहात संपन्न झाली. यावेळी भुसे बोलत होते. भुसे पुढे म्हणाले की, गृहविलगीकरणात असलेला रुग्ण सार्वजनिक ठिकाणी आढळून आल्यास थेट गुन्हा दाखल करावा. सामान्य रुग्णालयातील नॉन कोविड रुग्णांना शहरातील महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत असलेल्या सहारा रुग्णालयात स्थलांतरित करण्याची शक्यता पडताळून आवश्यक ती कार्यवाही करावी. सर्व रुग्णालयांत ऑक्सिजनसह मेडिसिन व उपलब्ध खाटांचा आढावा घेत ग्रामीण भागातील संभाव्य रुग्णसंख्या विचारात घेऊन महानगरपालिकेमार्फत आवश्यक खाटा तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी महानगरपालिका प्रशासनास केल्या. कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे चार महिन्यांपासून थकीत असलेले वेतन तातडीने प्रदान करण्याची कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. प्रत्येक रुग्णालयात किमान एक एम.बी.बी.एस. वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती तात्काळ करण्यात यावी. एन.डी.आर.एफ.अंतर्गत निधी उपलब्ध होण्यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्यात यावा. रुग्णवाढीचा विचार करून आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात यावी. ऑक्सिजनचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घेण्याचेही भुसे यांनी सांगितले.
इन्फो
लसीकरणासाठी समुपदेशन करा
लसीकरणासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ नागरिकांसह वयाची ४५ ते ५९ मधील कोमॉर्बीड रुग्णांसाठी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून मुस्लीमबहुल भागात त्याला अल्प प्रतिसाद आहे. त्यासाठी महापौरांसह, आमदार व नगरसेवकांनी पुढाकार घेऊन नागरिकांचे समुपदेशन करण्याचे आवाहन भुसे यांनी यावेळी केले.