अझहर शेख, नाशिक: अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना बसलेला फटका तसेच मान्सूनने दिलेली ओढ यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. बळीराजाला आर्थिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनातून एक दिवसाचे वेतन कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री निधीत ही रक्कम जमा होणार आहे. यासाठी सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये कार्यालयीन प्रमुखांकडून परिपत्रक फिरवून त्यावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या आहेत.
राज्यासह नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने मार्च व एप्रिलमध्ये अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. मार्च ते १७ एप्रिलपर्यंत सुमारे ४२ मिमी इतका पाऊस जिल्ह्यात पडला होता. वादळवाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह झालेला पाऊस व गारपिटीने हजारो हेक्टरवरील शेतीपिकांची नासाडी झाली होती. शेतकऱ्यांच्या हाताशी आलेल्या पिकाचा त्यांच्या डोळ्यांसमोर चिखल झाला. द्राक्षबागा, कांदा, गव्हासह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारी-कर्मचारी अधिकारीदेखील आपला एक दिवसाचा पगार देणार आहेत. राज्य सरकारने याबाबतचे आवाहन शासकीय कर्मचाऱ्यांना केले आहे. जून महिन्यातील एक दिवसाचा पगार जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अवकाळीचे जिल्ह्यात नुकसान किती?
मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला होता. १५ ते १९ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील ५६० गावांमधील १८ हजार ९९० शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचा चिखल झाला होता. यावेळी जिल्हा प्रशासनाने शासनाकडे १४ कोटी १० लाख २१ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईपोटी अनुदानाची मागणी केली होती. एप्रिल महिन्यात पुन्हा तडाखा बसल्यामुळे पुन्हा पंचनामे करण्यात आले. ७ ते १६ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ७८० गावांना जोरदार झाेडपून काढले होते. यावेळी ६६ हजार ९२३ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला एक दिवसाची पगार कपात
राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत. त्यांनी सरकारी आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:च्या पगारातून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे ठरविले आहे. जमा होणाऱ्या निधीतून राज्य सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देणार आहे. राजपत्रित अधिकारी वर्गानेही एक दिवसाच्या वेतनाची रक्कम दिली आहे.
मार्च-एप्रिलची नुकसानभरपाई अद्याप नाही!
मार्च-एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई अद्यापही शेतकऱ्यांच्या पदरी पडलेली नाही. कृषी व जिल्हा प्रशासनाने पूर्ण केलेल्या पंचनाम्यानंतर शासनाला पाठविलेल्या अनुदान अहवालानुसार अद्याप रक्कम दिली गेलेली नाही. या नुकसानभरपाईच्या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
एप्रिलमध्ये झालेले शेतपिकांचे नुकसान
- कांदा-३०,२५६.१३ हेक्टर
- गहू-७२३.८० हेक्टर
- मका- ३८०.६० हेक्टर
- टमाटा- ३२६.२० हेक्टर
- बाजरी- २२६.८० हेक्टर
- भाजीपाला-१७१५.५२ हेक्टर
- चारा पीके- ३३ हेक्टर
- द्राक्षे- २६४५.०७ हेक्टर
- आंबा- ५००.५५ हेक्टर
- डाळिंब-९९७.४७ हेक्टर