नाशिक : शिवभक्तीची ही ज्योत ज्वलंत ठेवण्यासाठी प्रत्येक शिवभक्तांच्या मनात असलेलं छत्रपतींचे ३२ मण सोन्याचं सिंहासन येत्या दोन वर्षांत रायगडावर पुन्हा प्रस्थापित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी केले.
राजीवनगर येथील मैदानावर झालेल्या या कार्यक्रमात शिवप्रतिष्ठानचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भिडे गुरुजी यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचे चरित्र हा प्रत्येक हिंदू व्यक्तीच्या जीवनाचा श्वास बनला पाहिजे, असे सांगितले. सध्याच्या पिढीतील बहुतांश जणांनी संपूर्ण शिवचरित्र, महाभारत, रामायण वाचलेले नाही, हे आपल्या देशाचे दुर्दैव आहे. त्यामुळेच शिवाजीराजे सर्वांना समजावून सांगण्यासाठी त्यांचे चरित्र वाचन करण्याचा संकल्प प्रत्येक युवकाने करावा, असेही त्यांनी नमूद केले.
आपल्या देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला जर खऱ्या अर्थाने परिपूर्ण बनवायचे असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला रामायण, महाभारत, मराठ्यांचा ज्वलंत इतिहास आणि संस्कृत भाषेचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे भिडे गुरुजींनी सांगितले. यावेळी गडकोट मोहीम, तसेच त्यानंतर आपापल्या भागात घरोघरी जाऊन शिवछत्रपतींच्या सिंहासनासाठी निधीसंकलन करण्याच्या कार्याचा संकल्प करण्यात आला.
---इन्फो ----
जगणे आणि मरणे शिकविले
शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य आणि स्वधर्मासाठी कसे जगावे याची शिकवण दिली आहे, तर धर्मवीर संभाजी महाराजांनी त्यांच्या मरणातून कितीही हाल झाले तरी स्वधर्मासाठी कसे मरावे याची शिकवण आपल्या सर्वांना दिली आहे. त्यामुळे या दोघांचे जीवनचरित्र नित्य स्मरणात ठेवावे, असेही भिडे यांनी नमूद केले.