सायखेडा : फेब्रुवारी महिन्यात थंडी कमी होऊन द्राक्ष फुगवणीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती मात्र हवेत अद्यापही प्रचंड गारवा असल्याने उशिरा फळधारणा असलेल्या द्राक्ष बागांची फुगवण थांबली आहे, भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. तालुक्यात थंडीचा कडाका कायम असून कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात सहा अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात वातावरणात बदल होऊन थंडी कमी होऊ लागते अनेक वेळा फेब्रुवारी महिन्याच्या सुरवातीला साधारण २० अंशवर तापमान असते. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यापासून सलग तीन महिने वातावरणात प्रचंड गारवा आहे.कांदा,गहू हरबरा पिकांना थंडी दिलासादायक असली तरी निफाडसह नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे असलेले नगदी पीक म्हणून द्राक्ष पिकाकडे पाहिले जाते मोठे भांडवल आण िवर्षातील एकाच वेळी घेतले जाणारे पीक असल्यामुळे शेतक-यांची वर्षाची आर्थिक परिस्थिती द्राक्ष पिकावर अवलंबून असते त्यामुळे नुकसान झाले तर आर्थिक गणित बिघडते.
निफाडचा पारा सहा अंशावर, द्राक्ष उत्पादक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 4:36 PM