मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.पावसाळ्यापूर्वी मनपाच्या स्वच्छता विभागाकडून शहरातील आझादनगर रस्ते, गांधी कपडा मार्केट, जमहूर नाला, दत्तनगर, पवारवाडी, मिल्लतनगर अशा विविध भागातील नाल्यांची सफाई करण्यात येत असे मात्र यंदा पावसाळा संपत आला असूनही गटारीची नाल्यांची स्वच्छता झालेली नाही. परिणामी सर्वच नाल्यांमध्ये गाळ, प्लॅस्टिक, कचरा साचल्याने अल्प प्रमाणातही पाऊस झाला तरी गटारीचे पाणी रस्त्यांवर येते. त्यामुळे अनेक भागात विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो आहे.कुठलेही गांभीर्य मनपास नसल्याचे चित्र दिसून येत आहे. स्वच्छतेअभावी नाल्यांमध्ये घाणीचे थर साचून राहतात. त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. डासांचा प्रादुर्भाव होऊन अनेक साथीचे आजार पसरत आहेत. शहरातील सामान्य रुग्णालय, मनपा रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी होत आहे. याबाबत गुरुवारी झालेल्या महासभेतही लोकप्रतिनिधींकडून मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. मंगळवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे गटारीच्या नाल्यालगत पवारवाडी परिसरातील वस्तीमध्ये पाणी शिरल्याने घरामध्ये तीन ते चार फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे संसारोपयोगी वस्तू, धान्य अशा विविध प्रकारच्या ९९ घरांचे ५४ लाख ७८ हजारांचे नुकसान झाले आहे. मनपातर्फे दोन-दिवस त्याच नाल्यांची सफाई करण्यात आली. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने शहरातील नाल्यांची तातडीने स्वच्छता करणे गरजेचे बनले आहे. मनपाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पितळ उघडे होऊनही संबंधित विभागावर कारवाई करण्याचे धारिष्ट्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दाखविली जात नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
शहरातील नाले सफाईबाबत मनपा उदासीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2019 11:28 PM
मालेगाव मध्य : शहरातील विविध भागांतील गटारींच्या नाल्यांची सफाई होत नसल्याने पावसाच्या हलक्या सरीही कोसळल्यास अनेक भागात रस्त्यावर पाणी जमा होत आहे. गेल्या मंगळवारी सरसय्यदनगरमध्ये घरात कमरेपर्यंत पाणी घुसले होते; मात्र या घटनेतूनही मनपा प्रशासनाने बोध घेतलेला जाणवत नसून नाल्यांची परिस्थिती जैसे थे आहे.
ठळक मुद्देमालेगाव। पावसाळ्यात साचते घरांमध्ये पाणी