खेडगाव : कोरोनाच्या महासंकटात मुंबईत सेवा बजावणारा एक पोलीस अधिकारी मोटारसायकलने दोनशे कि.मी. अंतर पार करीत रात्री ८ वाजेच्या सुमारास आपल्या गावात येतो, सहा महिन्यांपासून कुटुंबापासून दूर राहिलेला हा अधिकारी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करीत घराबाहेरील चौकातच भोजन घेतो, परिवारातील सदस्यांशी दुरूनच संवाद साधून आपण सुखात असल्याचे सांगतो आणि साडेचार तासांच्या भेटीनंतर आल्या पावली पुन्हा आपल्या कर्तव्यावर निघून जातो. खेडगाव येथे घडलेला हा प्रसंग पाहून त्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबीयातील सदस्यांसह मित्र परिवाराचेही डोळे पाणावतात आणि त्याच्या पाठीशी सदिच्छांचे बळ एकवटून त्याला निरोप देतात.खेडगावमधील एक पोलीस अधिकारी मुंबईत पोलीस दलात मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. सहा महिन्यांपासून या अधिकाºयाने आपल्या घराचे तोंडही पाहिलेले नाही. कर्तव्यावर असलेल्या या अधिकाºयाला घराची ओढ लागली आणि प्रशासकीय सूचनांचे पालन करत या अधिकाºयाने आपल्या मोटारसायकलने २०० कि.मी.चे अंतर पार करत गाव गाठले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काटेकोरपणे काळजी घेतली जात असल्याने या पोलीस अधिकाºयानेही फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करत घराबाहेरच थांबत साडेचार तास काढले. घराबाहेरील चौकात थांबून भोजन घेतले. जेवणाचा डबाही स्वत:च्या हाताने धूवून ठेवला आणि पोळ्यांचा कागद खिशात घालून घेत कुटुंबीयातील सदस्यांसह मित्रपरिवाराशी दुरूनच संवाद साधला. ‘मी सुखात आहे, थोडा मानसिक त्रास आहे, परंतु सुखरूप आहे’ असे सांगत तुम्हीही तुमची काळजी घ्या, असा सल्ला देत या अधिकाºयाने रात्री १२.३० वाजेच्या सुमारास मुंबईकडे प्रस्थान केले. यावेळी कुटुंबीयांसह आसपास असलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना निरोप देत दीर्घायुष्य चिंतिले. काहींचे डोळे पाणावले, तर त्या अधिकाºयाच्या आई-वडिलांना हुंदका आवरेनासा झाला.----------------आनंद आणि विरहकोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका पोलिसांनाही बसत असल्याने या पोलीस अधिकाºयाच्या आरोग्याविषयी त्याच्या कुटुंबीयातही काळजीचे ढग दाटून आले होते. आई-वडिलांचा एकुलता एक लेक असल्याने तर त्यांनाही गहिवरुन आले होते. काही तासांच्या या भेटीमुळे साऱ्यांच्याच चेहºयावर काही काळ आनंद आणि विरहाचेही चित्र बघायला मिळाले. आपला मित्र कोरोनाच्या काळात मुंबईत मोठी जबाबदारी निभावत असताना त्याची गळाभेटही घेऊ शकत नसल्याने मित्रपरिवारही नाराज होता, परंतु आपल्यामुळे गावातील लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असे होऊ नये, यासाठी या अधिकाºयाने सारे नियम पाळत दाखविलेल्या या प्रसंगावधानाचे गावकºयांनी कौतुक केले.
रात्री आला, चौकातच जेवला अन् कर्तव्यावर परतला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2020 10:02 PM