गेल्या काही दिवसांपासून स्वच्छ देवळाली सुंदर देवळाली व हरित देवळाली असे ब्रीद मिरवणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाचा स्वच्छता सर्वेक्षण २०२० मध्ये चांगलीच पिछाडी झाली होती. मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात कॅन्टोन्मेंट बोर्डाचा १३ नंबरने मागे जात स्वच्छता सर्वेक्षणात असलेल्या ६२ छावणी परिषदेंपैकी देवळाली कॅन्टोन्मेंट ५२ व्या स्थानी घसरण झाली. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता पुन्हा स्वच्छता सर्वेक्षण २०२१ मध्ये देखील सहभाग नोंदविला आहे. यामध्ये कचरा विलगीकरण या संकल्पनेवर कार्य सुरु असून याबाबत नागरिकांमध्ये अधिकाधिक जनजागृती व्हावी याकरिता शहरातील प्रमुख रस्त्यांवर रात्रीच्या वेळी स्वच्छता करण्याचा अनोखा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कुमार यांच्या संकल्पनेतून व आरोग्य विभागाचे अधीक्षक रजिंदरसिंह ठाकूर आणि सहाय्यक आरोग्य अधिक्षक अमान गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली लेव्हीट मार्केट, वडनेर रोड, मिठाई स्ट्रीट,मस्जिद स्ट्रीट, हौसन रोड परिसरात हि मोहीम टप्याटप्याने राबविण्यात येत आहे. यासाठी आरोग्य विभागामार्फत तेरा कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहे.
(फोटो १८ देवळाली)