सिडको : मुसळधार पावसाचा फटका नंदिनी लगतच्या मिलिंदनगर भागातील रहिवाशांनाही बसला. शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. पुरामुळे घरातील कपडे, भांडी तसेच इतर साहित्याचे नुकसान झाले.शासनाने थोड्या प्रमाणात धान्य देऊन सोपस्कार पार पाडले असले तरी ज्यांना मदत मिळणे गरजेचे त्यांना न मिळता इतरांनाच लाभ मिळत असल्याची भावना व्यक्त करतानाच शासनाने अधिकची मदत करण्याची अपेक्षाही येथील रहिवाशांनी व्यक्त केली.तिडकेनगर जवळील मिलिंदनगर भागात पंधराशेहून अधिक कुटुंबे राहात असून, याच मिलिंदनगर भागातून नंदिनी नदी वाहत असल्याने नदीलगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. नंदिनीला काही भागात संरक्षण भिंत नसल्याने पावसाळ्यात त्याठिकाणाहून थेट नागरिकांच्या घरात पाणी शिरते. येथील शंभराहून अधिक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांच्या घरातील कपडे, भांडी तसेच महत्त्वाच्या कागदपत्रांचे नुकसान झाले. पुरामुळे काही नागरिकांच्या घरात पाच फुटापर्यंत पाणी शिरल्याने त्यांना दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. तर सीताबाई मेढे यांचे पत्र्याचे घर संसारोपयोगी साहित्यासह पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. शासनाच्या वतीने नुकसानग्रस्त नागरिकांना दहा किलो तांदूळ व दहा किलो गहू दिले असले तरी यात काही नागरिकांनी आपल्याला मदत मिळाली नसल्याचे सांगितले.तसेच सुरेश लहांगे, गंगाधर पवार, संदीप साबळे, प्रमोद पानपाटील, विशाल मोहिते, विठाबाई हलवर, किरण हलवर, नईम शेख, इंदूबाई कांबळे, विजयमाला गजरे, मंगल गोरवे, सुमन लिलके, शेख यांच्याही घरात पावसाचे पाणी शिरले होते. पूर ओसरल्यानंतर या ठिकाणी चिखल व घाण साचली असून, अनेकांना थंडी-ताप व साथीचे आजार झाल्याचे नागरिकांनी सांगितले.नंदिनी नदीलगतच घर असल्यामुळे पुरामध्ये वाहून गेले. घराचे नुकसान तर झालेच, परंतु संसार पाण्यात वाहून गेल्याने सर्वकाही होत्याचे नव्हते झाले. अंगावर असलेल्या कपड्यांव्यतिरिक्त काहीच शिल्लक राहिले नसून शासनाने मदत करावी.-सीताबाई मेढे, रहिवासीघरामध्ये पाच फुटांपर्यंत पाणी आले होते. घरामध्ये पाणी शिरत असल्याचा अंदाज घेत कुलूप लावून संपूर्ण कुटुंब घराबाहेर आले. दोन दिवस घराबाहेर रहावे लागले. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. शासनाने अधिक मदत द्यावी.-भारती जाधव, रहिवासी