नाशिक : गेल्या अनेक वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या ओझर विमानतळावर अखेर नाइट पार्किंगला परवानगी मिळाली असून, त्यामुळे मुंबईच्या विमानतळावर जागा न मिळू शकणाऱ्या विमानांना आता नाशिकच्या विमानतळाचा पर्याय खुला झाला आहे. आता यापुढे जाऊन व्यावसायिक विमानांच्या देखभाल- दुरुस्तीची कामे याच विमानतळावर व्हावीत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एचएएलचे विमानतळ जेमतेम प्रवासी वाहनांसाठी खुले झाल्यापासून यासंदर्भात मागणी करण्यात येत होती. नाशिकला प्रवासी विमानसेवा सुरू करतानाच तेथे प्रशस्त जागा असल्याने रात्रीच्या वेळी विमाने पार्क करण्याची सुविधा उपलब्ध होऊ शकते आणि हीच विमाने नाशिकमध्ये प्रवाशांची ने-आणदेखील करू शकतात, अशी अपेक्षा होती. आठ ते दहा वर्षांपूर्वी एमआयडीसी आणि अन्य यंत्रणांच्या बैठकीत त्यावेळी तत्त्वत: मान्यताही मिळाली होती; परंतु हा विषय पु्ढे गेला नव्हता. दरम्यान, केंद्र सरकारच्या उडान योजनेमुळे नाशिकहून आंतरजिल्हा आणि आंतरराज्य सेवा सुरू झाली आणि नाशिकच्या विमानतळाबाबत चर्चाही सुरू झाली. त्यातून आता गेल्यावर्षी राज्य शासनाकडून हा विषय मंजूर झाला; परंतु एचएएल व्यवस्थापनाच्या परवानगीसाठी हा विषय प्रलंबित होता. त्याला आता मान्यता मिळाली आहे.
एचएएलच्या हँगरमध्ये तूर्तास सहा विमाने नाइट पार्किंगसाठी राहू शकतात आणि त्यानंतर ते प्रवासी वाहतूकदेखील करू शकतात. मुंबईला विमानतळावर लँडिंगासाठीही जागा नसल्याने अनेकवेळा विमानांना हवेत घिरट्या घालाव्या लागतात. आता मात्र, तेथील काहीसा ताण कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कोट...
नाशिकमध्ये रात्री मुक्कामासाठी विमानांना जागा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू होते. गेल्यावर्षी त्याला मान्यता मिळाली असली तरी एचएएल व्यवस्थापनाकडून परवानगी मिळणे अपेक्षित होते. कोरोनामुळे त्यास विलंब झाला असला तरी आता हा विषय मार्गी लागला आहे. आता खासगी विमानांच्या देखभाल-दुरुस्तीची येथे सोय व्हावी.
- मनीष रावळ, उद्योजक