---
नाशिक : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असली तरी या बिबट्यांकडून बहुतांश मानवी हल्ले संध्याकाळनंतरच झालेले दिसून येतात. काही दिवसांपूर्वीच सिन्नर तालुक्यात एक शेतमजूर रात्रीच्या वेळी शेतपिकांना पाणी देत असताना बिबट्याच्या हल्ल्यात त्याला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडली. सिन्नर, इगतपुरी, निफाड, दिंडोरी यांसारख्या तालुक्यांमधील गावांमध्ये रात्रीच्या वेळी शेतीसाठी वीजपुरवठा होत असल्याने मानव - वन्यप्राणी संघर्ष उभ राहताना दिसून येत आहे. याबाबत वन विभागाकडून महावितरण कार्यालयाला लेखी पत्रदेखील पाठविण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील गोदाकाठ, दारणाकाठ, वालदेवी, कादवा यांसारख्या नद्यांच्या काठालगत असलेल्या झाडीझुडुपांमध्ये तसेेच गंगापूर धरणाच्या डाव्या - उजव्या तट कालव्यांच्या परिसरातील झाडीच्या आश्रयाने बिबटे वास्तव्य करुन राहतात. सामनगाव, एकलहरे, जाखोरी, पळसे, हिंगणवेढे तसेच देवळाली कॅम्प, दोनवाडे, भगूर या भागात असलेल्या राखीव वनक्षेत्रांत तसेच लष्करी हद्दीच्या परिसरातील जंगलात बिबट्यांचे वास्तव्य आढळून येते. या भागात उसाची शेतीदेखील मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने बिबट्यांनी उसात आश्रय घेत आपला अधिवास बदलल्याचे वन्यजीवप्रेमी सांगतात. काही दिवसांपूर्वीच उसाचा गाळप हंगाम पूर्णत्त्वास आल्याने त्यांचा अधिवास एकप्रकारे संपुष्टात आल्याचे दिसून येते. यामुळे बिबटे नवीन आश्रयाच्या शोधात मळे परिसरात भटकंती करताना दिसतात.
---इन्फो---
...तर टळेल मानव-बिबटे संघर्ष
वीजपुरवठा रात्री होतो, म्हणून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अथवा शेतमजुरांना नाईलाजाने रात्रीच्या वेळी शेतात जावे लागते. यावेळी बिबट्या खाद्य - पाण्याच्या शोधात नैसर्गिक सवयीनुसार रात्रीच्या अंधारात बाहेर पडलेला असतो. दरम्यान, शेतात पाणी देणारे शेतकरी आणि बिबट्यांची नजरानजर होऊन बिबट्यांकडून मानवी हल्ले होत असल्याचे निरीक्षण वन विभागाने महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पाठविलेल्या पत्रात नोंदविले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी केवळ पिंजरा लावून बिबटे जेरबंद करणे हा एकमेव पर्याय नाही, तर रात्रीच्या वेळी होणारा वीजपुरवठा जर दिवसा ग्रामीण भागात करण्यास प्राधान्य दिले, तर बिबटे - मानव संघर्षही उफाळून येणार नाही, असे वन्यजीवप्रेमींचे म्हणणे आहे.
---इन्फो---
वर्षभरात बिबट्यांकडून २५ मानवी हल्ले
वर्षभरात जिल्ह्याच्या पश्चिम भागात विविध तालुक्यांमध्ये बिबट्यांकडून २२ ते २५ मानवी हल्ल्यांच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये सुमारे दहा नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये काही लहान मुलांचाही समावेश आहे. रात्रीच्या वेळी शेतीच्या परिसरात जाणाऱ्या लोकांचा सामना हमखास बिबट्यांशी होताना दिसून आलेला आहे. बिबट्या हा निशाचर वन्यप्राणी असून, तो त्याच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार रात्रीच्या सुमारास भक्ष्यासाठी बाहेर पडतो. यावेळी मळे परिसरात शेतीला पाणी देणाऱ्या व्यक्तींवर बिबट्यांकडून हल्ले होतात.
--इन्फो--
रात्री उघड्यावर शाैचास जाणे धोक्याचे
ग्रामीण भागात मुलांना रात्रीच्या वेळी उघड्यावर शौचास पाठविणे हेदेखील धोकादायक ठरते. इगतपुरी तालुक्यातील घोटी - भंडारदरावाडी रस्त्यावरील गावांमध्ये घडलेल्या बिबट हल्ल्यांच्या घटना नैसर्गिक विधीसाठी लहान मुले-मुली घराबाहेर पडलेल्या असताना झाल्या आहेत. यामुळे गावांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांनी जंगलाजवळील मोकळ्या जागेत रात्रीच्या वेळी एकटे किंवा दोघा तिघांनीसुध्दा मिळून नैसर्गिक विधीसाठी जाणे टाळल्यास बिबट्यांच्या मानवी हल्ल्यांना आळा बसण्यास मदत होईल, असे वन विभागाचे म्हणणे आहे.
--
फोटो आर वर १७बिबट्या नावाने सेव्ह केलेला आहे.
===Photopath===
170321\17nsk_15_17032021_13.jpg
===Caption===
बिबट्याकडून मानवी हल्ले