‘स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक’ हे घोषवाक्य जरी महापालिकेकडून मिरविले जात असले तरीदेखील शहरातील वृक्षसंपदेचे रक्षण करण्यास पालिका प्रशासन असमर्थ ठरत असल्याचे बाेलले जात आहे. गंगापूर रोडसारख्या परिसरात रस्त्यालगत असलेले भले मोठे आंब्याचे झाड अचानकपणे दुचाकीने आलेल्या दोघांनी कटरचा वापर करत कापून टाकले अन् धूम ठोकली. भरवस्तीत घडलेल्या या अजब प्रकारामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच सातपूर अग्निशमन उपकेंद्राचे फायरमन तौसिफ शेख, राजेंद्र मोरे, शिवाजी खुळगे, विजय ठाकूर, जगदीश गायकवाड आदींनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, जेव्हा जवानांनी रस्त्यावर कोसळलेल्या झाडाचा बुंधा बारकाईने बघितला तेव्हा हे झाड नैसर्गिकरीत्या कोसळलेले नाही, तर कोणी तरी अज्ञात व्यक्तीने कटरच्या साहाय्याने झाड कापून पळ काढल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा पर्यावरण संरक्षण कायद्याचा भंग ठरणार असल्याने जवानांनी मनपा उद्यान विभागाशी संपर्क साधून अगोदर पंचनामा पूर्ण करण्याबाबत स्थानिकांना कळविले. नागरिकांनी उद्यान विभागाशी संपर्क साधून माहिती दिली. यानंतर उद्यान विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत कापलेल्या आंब्याच्या झाडाचा पंचनामा केला. यानंतर जवानांनी हे झाड रस्त्यावरून हटविले आणि दिवस उजाडल्यानंतर रहदारीला वेग येईपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
--इन्फो-
झाडाची कत्तल करणारे सीसीटीव्हीत कैद
आंब्याच्या झाडाची कत्तल करणारे अज्ञात संशयित दुचाकीस्वार येथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. याबाबत उद्यान विभागाने पंचनामा व आदी प्रक्रिया पूर्ण केली असून, गंगापूर पोलीस ठाण्यात या संशयितांविरुद्ध तक्रार दाखल केली जाणार असल्याची माहिती उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांनी दिली आहे. थत्तेनगर येथे काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे विनापरवाना कापण्यात आलेल्या वृक्षाबाबतही चौकशी करत माहिती मागविली असल्याचे त्यांनी सांगितले.
---
फोटो क्र : १६पीएचजेएन७७/७८