नाशिक : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने रात्रपाळीची सफाई बंद करण्याचा ठराव केल्याची माहिती बुधवारी (दि.२०) झालेल्या महासभेत सभागृहनेता दिनकर पाटील यांनी दिली. मात्र, रात्रपाळीची सफाई बंद करण्यास शिवसेनेसह मनसेने विरोध दर्शविला आहे. भाजपाने महासभेत चर्चा न करताच सदर निर्णय घेतल्याने आश्चर्यही व्यक्त करण्यात आले आहे. दरम्यान, भाजपाच्या या निर्णयाविरुद्ध सफाई कामगारांच्या संघटनेनेही काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.गुरुवारी झालेल्या महासभेत सभागृहनेता दिनकर पाटील यांनी रात्रपाळीच्या साफसफाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सफाई बंद करण्याचा ठराव केल्याची माहिती सभागृहाला दिली. या रात्रपाळीच्या सफाईसाठी दरमहा ५० लाख, तर वर्षाला सहा कोटी रुपयांची बिले काढण्यात आली. परंतु, आपल्या प्रभागात कधीही रात्रीची सफाई झाल्याचे निदर्शनास आले नसल्याचेही दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रात्रपाळीची सफाई बंद करून आउटसोर्सिंगने सफाई कामगारांची भरती करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. मात्र, रात्रपाळीची सफाई बंद करण्यास शिवसेनेसह मनसेने तीव्र विरोध दर्शविला आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व मनसेचे गटनेता सलीम शेख यांनी सदर सफाई कायम सुरू ठेवण्याची मागणी केली. दरम्यान, रात्रपाळीच्या सफाई बंद करण्यास सफाई कामगारांच्या संघटनांनीही विरोध दर्शविला आहे. सत्ताधारी भाजपाने सदर निर्णय मागे न घेतल्यास महापालिकेत मैला फेको आंदोलन आणि काम बंद आंदोलन पुकारण्याचा इशारा संघटनेचे नेते सुरेश मारू यांनी दिला आहे.
रात्रपाळीच्या सफाई बंदला सेना-मनसेचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 1:00 AM