लोकमत न्यूज नेटवर्कपंचवटी : पेठरोडवरील नवनाथनगर परिसरात राहणाऱ्या किरण निकम (३०) या युवकाच्या खूनप्रकरणी मागील दोन महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारा संतोष उघडे या संशयिताच्या मुसक्या आवळण्यास अखेर पंचवटी पोलिसांना यश आले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मे महिन्यात निकम याची पूर्ववैमनस्यातून संशयित आरोपी संतोष उघडे, गणेश उघडे, बंडू मुर्तडक व संतोष पगारे यांच्या टोळीने नवनाथनगर परिसरात असलेल्या भरवस्तीत धारदार शस्त्राने हल्ला के ला होता. या हल्ल्यात निकम याचा मृत्यू झाला. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाले होते. काही दिवसांत पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली होती, तर उघडे हा फरार होता. पोलीस दोन महिन्यांपासून त्याच्या मागावर होते, मात्र अनेकदा गुंगार देऊन पळ काढण्यास उघडे यशस्वी होत होता. अखेर बुधवारी (दि.१२) त्याला ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले. काही दिवसांपूर्वी उघडे याच्या वाढदिवसाचे फोटो सोशल मीडियावर झळकल्याने पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला. तसेच त्याच्या अटकेचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले होते. संशयिताचे फोटो सोशल मीडियावर झळकल्याने पंचवटी पोलिसांनी सर्वस्व पणाला लावले आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी पथक तयार करत संशयित ज्या परिसरात येणार होता, तेथे सापळा रचला. अखेर त्याला या सापळ्यात अडकवून ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे.
निकम खूनप्रकरणी संशयितास अटक
By admin | Published: July 14, 2017 1:41 AM