सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या द्वैवार्षिक निवडणुकीत प्रथमच तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. ३१ जागांसाठी ८६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. रविवारी (दि.२९) निमा कार्यालयात मतदान घेण्यात येणार असून, मतदानाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती निवडणूक अधिकारी विवेक गोगटे यांनी दिली आहे. निमाच्या द्वैवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलमध्ये फूट पडल्याने एकता पॅनल दोन गटांत विभागले गेले आहे. यात निमाचे माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचे एकता पॅनल आणि किशोर राठी-आशिष नहार यांचेही एकता पॅनल यांच्या विरोधात उद्योग विकास पॅनल असे तीन पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवीत आहेत. या निवडणुकीत तीनही पॅनल कडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. तीनही पॅनलकडून मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्याबरोबरच सोशल मीडिया, लघुसंदेशांद्वारें प्रचार करण्यात आला आहे, तर ठिकठिकाणी होर्डिंग्ज लावूनदेखील प्रचार करण्यात आला. अध्यक्षपदासाठी हरिशंकर बॅनर्जी आणि किशोर राठी यांच्यात सरळसरळ लढत होत आहे. मोठ्या उद्योगातील प्रतिनिधी निवडणुकीला सामोरे जात आहे. या उद्योग विकास पॅनलकडे अध्यक्षपदाचा उमेदवार नाही. अध्यक्ष पदाशिवाय हे पॅनल निवडणूक लढवित आहे. ही निवडणूक तीनही पॅनलकडून प्रतिष्ठेची करण्यात आली आहे.
निमाचे आज मतदान ३१ जागांसाठी ८६ उमेदवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:18 AM