लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : अंबड येथील क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज पॉवर सोल्युशन्स कंपनीकडे अडकलेल्या ११० व्हेंडर्सचे २२५ कोटी रुपये मिळविण्यासाठी सर्व व्हेंडर्सनी एकत्र येऊन निमाच्या माध्यमातून पुढील लढा देण्याचा निर्णय बुधवारी निमात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अंबड औद्योगिक वसहतीतील क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज पॉवर सोल्युशन्स कंपनीकडे नाशिकमधील ११० व्हेंडर्सचे (लघुउद्योजकांचे) सुमारे २२५कोटी रुपये गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडल्याने हे उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम कामगारांवर झाला असून त्यांच्यावर बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज कंपनीकडून पैसे मिळविण्यासाठी या लघुउद्योजकांनी निमाकडे धाव घेतली आहे. गुरुवारी निमात या व्हेंडर्सची बैठक घेण्यात आली. या बैठकीत वेंडर्सनी आपापली कैफियत मांडली. पैसे अडकल्यामुळे कोणकोणत्या संकटांना सामोरे जावे लागत आहे याची माहिती देण्यात आली आणि आता यापुढील लढा देण्यासाठी निमाच्या माध्यमातून प्रयत्न करावेत. त्यासाठी सवार्नुमते सर्व अधिकार निमाला देण्यात आले.
निमाच्या माध्यमातून क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आहे. निमाचे शिष्टमंडळ शुक्रवारी कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेणार आहेत. गरज पडल्यास कंपनीच्या मुख्यालयात जाऊन संचालक मंडळाशी चर्चा करतील. पुढील आठवड्यात पुन्हा व्हेंडर्सची बैठक घेऊन चर्चा केली जाईल. ‘झुम’ बैठकीत या मुद्दा प्रमुख्याने उपस्थित केला जाईल. तत्पूर्वी सर्व वेंडर्सनी निमाकडे वैयक्तिक अर्ज दाखल करावा असे आवाहन निमातर्फे यावेळी करण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, उद्योजकांच्या समस्या,अडचणी सोडविण्यासाठी शासनाच्या समाधान पोर्टल आणि सुकर्ता परिषदेत बाधित वेंडर्सनी (लघुउद्योजकांनी) आपल्या तक्रारी दाखल केल्यास न्याय मिळेल असे सांगितले. या बैठकीस निमा अध्यक्ष शशिकांत जाधव, सरचिटणीस तुषार चव्हाण, प्रदीप पेशकार, संजय महाजन, कैलास अहिरे, महेश दाबक, संजय सोनवणे, राजेंद्र कोठावदे आदींसह निमा पदाधिकारी व वेंडर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.