येवला : निमगाव मढ येथे घडलेल्या खुनाच्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला असून संबंधित गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतले आहे. अनैतिक संबंधांवरून सदर खून झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.तालुक्यातील निमगाव मढ येथे १ सप्टेबर रोजी उसाच्या शेतात एका अनोळखी महिलेचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळले होते. सदर महिलेचा फक्त सांगाडाच शिल्लक राहिलेला होता. त्यामुळे महिलेची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते. घटनास्थळावर मयत महिलेच्या अंगावर असलेल्या साडी व अन्य वस्तूंची पडताळणी केली असता शहर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्र ार दाखल असल्याबाबतची माहिती मिळाली. त्यावरून महिलेच्या नातेवाईकांशी संपर्कसाधला जाऊन मृत महिला ही सरला कृष्णा सोमासे (वय ४३, रा.पारेगाव ता. येवला) असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, पोलीसांनी तपास सुरू केला असता महिलेस कोणीतरी अज्ञात आरोपीनी ठार मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत उसाचे शेतात फेकून दिल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे व अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या घटनेचा आढावा घेऊन तपासकामी सूचना केल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्यासह पथकाने या गुन्ह्याचा तपास केला असता, मयत महिलेचे तालुक्यातील महालखेडा येथील दोन इसमांशी अनैतिक संबध असल्याचे समजले. त्यानुसार पोलीसांनी महालखेडा परिसरातून निलेश भागवत गिते (वय २७) व अमोल दत्तू मोरे (वय २०) यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी याप्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. कोणताही पुरावा समोर नसताना पोलिस संशयितांपर्यंत जाऊन पोहोचल्याने खुनाचा उलगडा होऊ शकला.गळा आवळून खूनपोलीसांनी सांगितल्यानुसार, संशयीत निलेश गिते व अमोल मोरे हे दोघे मित्र असुन दोघेही विवाहित आहेत. सदर महिलेशी संबध जुळल्यानंतर त्यांची तिच्याशी जवळीक वाढली होती. त्यात महिलेकडून दोघांकडे पैशांची मागणी व्हायला लागली. पैसे दिले नाही तर कुटुंबियांना सर्व प्रकार सांगण्याची धमकीही दिली गेली. या प्रकारची वाच्यता झाल्यास समाजात बदनामी होईल या भीतीने दोघांनी सदर महिलेस कायमचे संपविण्याचा विचार पक्का केला व तिला दि. २२ आॅगस्ट रोजी महालखेडा गावात लक्ष्मीदेवीच्या यात्रेत पैसे देण्याच्या हेतूने घेऊन गेले. तेथे शेतात नेऊन तिच्या गळयातील स्कार्पने गळा आवळुन तिचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
निमगाव मढ येथील खुनाचे गूढ उकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2018 8:07 PM
अनैतिक संबंधातून खून : स्थानिक गुन्हे शाखेचा तपास
ठळक मुद्देमहिलेची ओळख पटविणे पोलिसांपुढे आव्हान होते