नाशिक : पंचवटी पोलीस ठाणे हद्दीत टोळी तयार करून विविध प्रकारचे शरीराविरुद्धच्या गुन्हेगारी कारवाया करणारा टोळीप्रमुख राकेश तुकाराम कोष्टी (२६, रा. दत्त चौक, सिडको) याच्यासह त्याच्या टोळीतील नऊ सराईत गुंडांना शहरासह जिल्ह्यातून उपआयुक्त अमोल तांबे यांनी दोन वर्षांसाठी तडीपार करण्याचे आदेश सोमवारी (दि.११) दिले.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातत्याने पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या कोष्टीच्या टोळीला चाप लावण्यासाठी पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे. यामध्ये कोष्टीसह जयेश ऊर्फ जया हिरामण दिवे (२५, रा. इंद्रकुं ड), आकाश विलास जाधव (१९, रा. मखमलाबाद नाका), मयूर ऊर्फ मुन्ना शिवराम कानडे (२३, रा. मेहरधाम) यांना दोन वर्षांसाठी तडीपार केले आहेत. तसेच त्यांचे साथीदार अजय दिलीप बागुल (२९, रा. मोरे मळा, रामवाडी), किरण दिनेश नागरे (३०, रा. जाणता राजा कॉलनी) या दोघा गुंडांना सहा महिन्यांसाठी तडीपार करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.शहरातील संघटीत गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलीस आयुक्तांनी तयार केलेल्या अॅक्शन प्लॅननुसार गुन्हेगारांवर कारवाईचे सत्र सुरु करण्यात आले आहे. सध्या संवेदनशील परिस्थिती असल्याने परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीसांकडून तडीपार गुंडांची माहिती घेतली जात आहे.महाराष्टÑ पोलीस कायदा कलम ५६ अन्वये बबी ऊर्फ प्रताप अशोकबना खाकोडिया (१९, रा. गणेशवाडी) यास १ वर्षासाठी तर राहुल उत्तम शिंदे (१९, रा. भराडवाडी, फुलेनगर), किरण दत्तात्रय शेळके (२६, रा. महावीरनगर) या सराईत गुंडांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. या गुन्हेगारांविरुद्ध शरीरासह मालाविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने गुन्हेगारी प्रवृत्तीस प्रतिबंध घालण्यासाठी त्यांच्या तडीपार प्रकरणाची चौकशी करण्यात येऊन तांबे यांनी आयुक्तालय हद्दीसह जिल्ह्यातून तडीपार केले आहे. अद्याप परिमंडळ-१मधून ९२ सराईत गुन्हेगारांना तडीपार करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
राकेश कोष्टीसह नऊ गुंडांवर तडीपारीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 1:20 AM