सिडको : सिडको तसेच अंबड व परिसरात मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले आहे. गेल्या नऊ महिन्यांत लहान बालकांसह सुमारे ७४७ जणांना चावा घेऊन जखमी केले असल्याची नोंद सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात करण्यात आली आहे.उघड्यावर मांसविक्री करून खराब झालेले मांस दुकानासमोर टाकून देणाऱ्या विक्रेत्यांमुळे मोकाट कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. सिडको तसेच अंबड व परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कंपनी कामगार हे रात्रीच्या सुमारास कामावर जाताना तसेच कामावरून घरी जाणाऱ्यांना मोकाट कुत्र्यांच्या दहशतीचा सामना करावा लागत आहे. आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे सिडको भागात सर्रासपणे उघड्यावर मांसविक्री करणे सुरूच असून, यामुळे तसेच ठिकठिकाणी साचलेला घाण व कचऱ्यामुळे कुत्र्यांची संख्या वाढली आहे. मनपाच्या सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दररोजच कोणाला तरी मोकाट कुत्र्याने चावा घेऊन जखमी केल्याची नोंद करण्यात आली आहे. रुग्णालयाच्या वतीनेही तत्काळ जखमी झालेल्यांना व रेबीजचे इंजेक्शन देण्यात येत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. शहराच्या अन्य भागांपेक्षा सिडकोचा कुत्र्याचा उपद्रव अधिक आहे. (वार्ताहर)
सिडकोत नऊ महिन्यांत ७४७ जणांना श्वानदंश
By admin | Published: December 23, 2014 11:55 PM