नाशिक - छताला लागलेली जळमटे, कोप-यात-कपाटाच्यावर मिळेल तिथे कोंबून ठेवलेल्या फाईलींचे गठ्ठे, काळेकुट्ट पंखे, टेबलच्या ड्रॉवरबाहेर डोकावणारी कागदपत्रे, टेबलांवर साचलेली धूळ...असे ओंगळवाणे दर्शन महापालिकेत पहिल्याच दिवशी घडल्यानंतर नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खातेप्रमुखांची झाडाझडती घेतली आणि शनिवारी (दि.१०) महापालिका मुख्यालयातील सा-या विभागांमध्ये ‘साफसफाई’साठी सारे हात झाडून कामाला लागले. साहेबांनी सुटी खराब केल्याची नाराजी कर्मचारी-अधिका-यांच्या चेह-यावर असली तरी, नोकरी गमावण्यापेक्षा सुटी गमावलेली बरी असा भाव मात्र दिसून आला. त्यामुळे दिवसभरात महापालिकेत साफसफाईचा माहोल होता.महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार शुक्रवारी (दि.९) तुकाराम मुंढे यांनी स्वीकारल्यानंतर, दुपारच्या सत्रात त्यांनी मुख्यालयातील विविध विभागांमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी, मुंढे यांना विभागांमध्ये फाईली अस्ताव्यस्त दिसून आल्या. कपाटांमध्ये दस्तावेज कोंबलेले आढळून आले. टेबलांवर तसेच संगणक धुळीने माखलेले पाहायला मिळाले. काही कर्मचा-यांच्या टेबलांचे ड्रॉवर तपासल्यानंतर त्यातही अव्यवस्थितपणा नजरेस पडला. छतावर, भिंतीच्या कोप-यात जळमटे दिसून आली तर पंख्यावर धूळ साचलेली बघायला मिळाली. शिवाय, विभागांमध्ये वर्कशीट नसल्याचे आढळून आले. टपालाच्या आवक-जावक नोंदी नव्हत्या. विभागाच्या टीपणी व्यवस्थित नव्हत्या. या सा-या प्रकाराबद्दल मुंढे यांनी खातेप्रमुखांची झाडाझडती घेतली आणि दोन दिवसात सारे कसे नीटनेटके करण्याचा आदेश दिला. मुंढे यांच्या दणक्यानंतर, दुसरा शनिवार सुटीचा दिवस असतानाही महापालिका मुख्यालयात वरिष्ठ अधिका-यांसह कर्मचारी झाडून हजर झाले. यावेळी मुख्य लेखापरीक्षक महेश बच्छाव यांनी खातेप्रमुखांसह कर्मचाºयांना फाईलींची मांडणी कशी करावी, सिक्स बंडल पद्धत कशा प्रकारे अंमलात आणावी, रेकॉर्ड कशा प्रकारे ठेवावेत, त्यांच्या नोंदी कशा असाव्यात याबाबतचे मार्गदर्शन केले. त्यानंतर टीम महापालिका कामाला लागली. प्रत्येक विभागातील अनावश्यक फाईली, कागदपत्रांचा, साधनांचा कचरा बाहेर आला. टेबलावरील-पंख्यावरील धूळ झटकली गेली. भिंतीवरील जळमटे हटविण्यात आली. रात्री उशिरापर्यंत महापालिका मुख्यालयात ‘मिशन साफसफाई’ सुरू होती. स्वत: दोन्ही अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुख जातीने हजर राहून मोहिमेवर लक्ष ठेवून होते. शनिवारी सुटीच्या दिवशीही साहेबांनी कामाला लावल्याने अधिकारी-कर्मचा-यांच्या चेह-यावर नाराजीचा भाव दिसून आला परंतु, स्वच्छता झाली नाही तर नोकरी गमावण्याची वेळ येऊ शकते, या भीतीने दिवसभर हात साफसफाईत गुंतलेले होते. साफसफाईतून बाहेर पडलेला कचरा, काही फाईली, दस्तावेज यांची गुदामात पाठवणी करण्यात आली.तपासणीचा धसकातुकाराम मुंढे हे येत्या सोमवारी (दि.१२) महापालिका मुख्यालयात येतील त्यावेळी केव्हाही-कधीही ते विभागांमध्ये जाऊन तपासणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे शनिवार-रविवारी सुटीच्या दिवशी आपला विभाग नीटनेटका ठेवण्यासाठी खातेप्रमुखांसह कर्मचारी साफसफाई मोहिमेत सहभागी झाले होते. प्रत्येक विभागाला यापुढे कामकाजाचा साप्ताहिक अहवाल आयुक्तांना सादर करणे बंधनकारक करण्यात आले असून त्यासंबंधीचा एक गोषवाराही देण्यात आला आहे.
मुंढेंच्या दणक्यानंतर नाशिक महापालिकेतील जळमटे हटली; धूळ झटकली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 6:45 PM
महापालिकेत ‘साफसफाई’ : सुटीच्या दिवशी अधिकारी-कर्मचा-यांचे मिशन
ठळक मुद्देओंगळवाणे दर्शन महापालिकेत पहिल्याच दिवशी घडल्यानंतर नवनियुक्त आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खातेप्रमुखांची झाडाझडतीसाहेबांनी सुटी खराब केल्याची नाराजी कर्मचारी-अधिका-यांच्या चेह-यावर असली तरी, नोकरी गमावण्यापेक्षा सुटी गमावलेली बरी असा भाव मात्र दिसून आला