नाशिक : व्यावसायिक कारणातून शिंगाडा तलाव परिसरात व्यावसायिक व कामगारांचे दोन गट समोरासमोर शुक्रवारी (दि.८) भिडले होते. या भागात तुफान दगडफेक व शस्त्राने जीवघेणा हल्ला चढवून दंगल माजविण्यात आली होती. यामध्ये तीघे गंभीररित्या जखमी झाले असून पोलिसांनी दोन्ही गटांतील ३६संशयित दंगेखोरांविरूद्ध गुन्हे दाखल केले. त्यापैकी नऊ संशशयितांना बेड्या ठोकल्या. त्यांना शनिवारी (दि.९) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने मंगळवारपर्यंत (दि.११) पोलीस कोठडी सुनावली.
शिंगाडा तलाव येथे असलेल्या मनपाच्या अग्निशमन मुख्यालयासमोरील शिवमुद्रा कार डेकाेर येथे कार डेकाॅरचे मालक व कामगारांतील जुन्या वादातून शुक्रवारी ठिणगी पडली. यावेळी बाहेरच्या काही लोकांना बोलविण्यात आल्याने क्षणार्धात दंगल भडकली. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या दिशेने दगडफेक सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका, भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करत परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण मिळविले. दंगल माजविणाऱ्यांपैकी नऊ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. २७संशयितांच्या शोधासाठी विविध पथके वेगवेगळ्या शहरांमध्ये रवाना करण्यात आली आहेत. सार्वजनिक शांतता भंग करणे, पाेलीस आयुक्तांच्या जमावबंदी व हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन करणे, गैरकायद्याने जमाव जमविणे, दगडफेक करणे, आदी कलमान्वये संशयितांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. फरार दंगलखोरांच्या मागावर गुन्हे शाखा, युनिट-१ व २ची पथकेही असून पुढील काही तासांत संशयितांना अटक करण्यात येईल, असा विश्वास सूत्रांनी व्यक्त केला आहे.
या दंगलखोरांची नावे आली समोर
दंगल माजविणाऱ्यांमध्ये संशयित राहुल राऊत, मनोज राऊत, उमेश राऊत, प्रभाकर कार डेकाॅरचे मालक प्रविण, विनोद थोरात, कौशल वाखारकर, तुकाराम राठोड, किल्ली बनविणारा अहमद, नाजीम पिरजादे, अन्वर शेख, अज्जू मामू, परवेज निसार शेख, मोबीन, जैनुल आबेदीन मौलवी, आरबाज, दानिश, शोएब, फरहान, शाहरूख, प्रेम, अश्पाक व अन्य १५ अनोळखी संशयित दंगेखाेरांची नावे समाेर आली आहेत. दंगलखोरांनी हातात तलवार, कोयते व बांबुसारखे हत्यार घेऊन दगडफेक व शिवीगाळ करून इतरांची व स्वत:ची सुरक्षा धोक्यात आणत एकमेकांवर हल्ला चढविला होता.