संदीप झिरवाळ पंचवटी
पूर्वीचा प्रभाग क्रमांक ३, १० आणि ११ असे तीन प्रभाग मिळून नवीन प्रभागरचनेत प्रभाग ३ची निर्मिती झाली आहे. गेल्या चार पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांनी भाजपाला सर्वाधिक पसंती दिल्याने हा भाग भाजपाचा गड मानला जातो. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत याच प्रभागात भाजपा, राष्टÑवादी कॉँग्रेस तसेच मनसेच्या उमेदवारांना मतदारांनी कौल दिला होता. गणेशवाडीपासून सुरू झालेल्या प्रभागाची व्याप्ती थेट रासबिहारी शाळेच्या मागील बाजूपर्यंत असल्याने विद्यमान लोकप्रतिनिधींपुढे नवीन उमेदवारांचे आव्हान उभे ठाकणार आहे. जुन्या तीन प्रभागांचा एक प्रभाग झाला आहे. संपूर्ण हिंरावाडी, धात्रकफाटा, जुना आडगाव नाका, विजयनगर कॉलनी, जनार्दनस्वामीनगर, हिरावाडीरोड, त्रिमूर्तीनगर हा नवीन भाग जोडला गेला, तर आमदार बाळासाहेब सानप यांचा जुना प्रभाग क्रमांक ११चा जवळपास सर्वच भाग जोडण्यात आला आहे. प्रभागात आजही नवीन वसाहतीत रस्त्यांच्या समस्या आहेत. नागरी वसाहत झाली तरी रस्त्यांचे डांबरीकरण नाही, पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते, तर प्रभाग मोठा असल्याने घंटागाडीची समस्या भेडसावते. यापूर्वी द्विसदस्यीय -त्रिसदस्यीय प्रभागरचनेमुळे ठरावीक भागांकडेच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिल्याचा आरोप मतदारांनी केला आहे. पूर्वीच्या प्रभाग ३ मधील तारवालानगर, लामखेडे मळा, तलाठी कॉलनी, तर प्रभाग १० मधील वेताळबाबा मंदिर, गजानन चौक, सेवाकुंज कॉलनी हा भाग पूर्णपणे वगळण्यात आला आहे. नवीन भागात जॉगिंंग ट्रॅक, व्यायामशाळा, सांस्कृतिक भवन, वाचनालय आदि सुविधा पुरविण्याची मागणी आहे. एका भागात भाजपाने गड राखला आहे, तर दुसºया भागात दरवेळेस नव्या चेहºयांना संधी मिळाली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत चुरस दिसून येणार आहे.