सायखेडा : राज्यातील विविध संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी तीनदिवसीय संप पुकारलेला आहे. या संपात निफाड तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक यांसह ग्रामसेवक, महसूल विभागाचे कर्मचारीही उतरले असून, तालुक्यतील ८९० शिक्षक संपात सहभागी झाले आहेत.तालुका शिक्षक समन्वय समितीच्या वतीने तहसीलदार दीपक पाटील, गटविकास अधिकारी संदीप कराड, शिक्षण विस्तार अधिकारी बोरसे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी प्राथमिक शिक्षक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क संघटना, पदवीधर शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. राज्यातील विविध कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर सातवा वेतन आयोग लागू करणे, नोव्हेंबर २००५ नंतर शासकीय सेवेत रु जू झालेल्या कर्मचाºयांना निवृत्ती पेन्शन योजना लागू करण्यात यावी, थकीत महागाई भत्ता तत्काळ देण्यात यावा यांसह विविध मागण्यांसाठी राज्यातील कर्मचारी संघटनांच्या समन्वय समितीने तीन दिवस संप पुकारला आहे.तालुक्यातील जवळपास ९० टक्के शिक्षक संपात सहभागी झाले असल्याने तीन दिवस शाळा बंद राहणार आहेत. पंचायत समिती, तहसीदार कार्यालय, कृषी विभागातील कामे ठप्प राहणार असल्याने नागरिकांची गैरसोय होणार आहे.