नाशिक : नांदी फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेमार्फत महापालिकेच्या १७ शाळांमधील गरजू विद्यार्थिनींना शिक्षणास साहाय्य म्हणून ‘नन्ही कली’ प्रकल्प राबविला जाणार असून, प्रकल्पांतर्गत विद्यार्थिनींना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. महापालिका शाळांमधील २ हजार ७९२ विद्यार्थिनींना या प्रकल्पाचा लाभ घेता येणार आहे.‘नन्ही कली’ या प्रकल्पासाठी महापालिकेमार्फत शाळांमधील वर्गखोली मोफत उपलब्ध करून दिली जाणार असून, विद्यार्थिनींची वैयक्तिक, सामाजिक व कौटुंबिक माहितीही संस्थेला पुरविली जाणार आहे. सदर मनपाच्या शाळांमध्ये मोफत अभ्यासिका वर्ग हे केवळ विद्यार्थिनींसाठीच चालविले जातील. काही निवडक शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी वाचनालयाचा प्रकल्प राबविला जाणार आहे. शाळेतील मुख्याध्यापकांशी चर्चा करून विविध सामाजिक उपक्रम, कार्यशाळा, नन्ही कली पालक सभा, गृहभेटी व वस्तीभेटी आदि उपक्रमही विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित केल्या जाणार आहेत. याशिवाय सण-उत्सवाच्या सुट्यांच्या काळात पालक व शिक्षकांच्या संमतीने अभ्यासवर्ग, छंदवर्ग, क्षेत्रभेटी, मनोरंजनात्मक सहलींचे आयोजन केले जाणार आहे. प्रकल्पांतर्गत नन्ही कलींना मोफत शैक्षणिक साहित्य व नन्ही कली किटही पुरविले जाईल. (प्रतिनिधी)
मनपाच्या २० शाळांमध्ये ‘नन्ही कली’ प्रकल्प
By admin | Published: August 04, 2015 11:51 PM