चांदोरी
:
कोरोनाचे संकट काहीसे दूर होत असतानाच आता येत्या पावसाळ्यात महापुराचे संकट येऊन ठेपले आहे.
यंदा हवामान खात्याच्या अंदाजानुसार चांगला पाऊस होणार असल्याने त्यादृष्टीने तालुका प्रशासन तयारीला लागले आहे.
निफाड तालुक्याचे तहसीलदार शरद घोरपडे, प्रांताधिकारी डॉ. अर्चना पठारे यांनी त्या पार्श्वभूमीवर सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. दरवर्षी निफाड तालुक्यातील १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो. या महापुरामुळे शेती, छोटे-मोठे व्यावसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठ्या प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते, तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक शहरांत जोरदार पाऊस झाला की, गंगापूर व दारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो व शहरातील पाणी त्यात मिसळले की पाणी वाहत थेट गोदाकाठावरील गावांत शिरते. दरवर्षी जिल्हा व तालुका प्रशासन पूरस्थितीबाबत आढावा घेऊन योजना तयार करत असते. यंदाही त्यानुसार योजना तयार करण्यात आली आहे. गोदाकाठ भागात पूरस्थितीत देवदूत म्हणून काम करणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांच्या अडचणी यावेळी जाणून घेण्यात आल्या.
इन्फो स्थलांतराबाबत सूचना
जूनच्या पहिल्या आठवड्यात पूररेषेत राहणाऱ्या नागरिकांना प्रत्येकाने स्वतःच्या मार्गाने स्थलांतर होऊन सुरक्षित स्थळी निघून जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांना धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाबाबत वेळोवेळी माहिती देण्यासाठी नियोजन केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन समितीने पूरस्थिती बचाव करण्यासाठी लागणाऱ्या यंत्र व इतर साहित्याची तपासणी व प्रात्यक्षिके व सराव करून पूर्वतयारी केली आहे.
इन्फो या गावांना बसतो महापुराचा फटका
निफाड तालुक्यात गोदावरी नदीकाठावरील दारणसांगवी, वर्हेदारणा, लालपाडी, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, करंजगाव, शिंगवे, चापडगाव, भेंडाळी व कादवा नदीकाठावरील पिंपळगाव बसवंत, कुंदेवाडी, निफाड, रौळस, बाणगंगा नदीकाठावरील सुकेणा गावाला महापुराचा फटका बसत असतो. दरम्यान, महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने १ रबरी बोट, ४० स्वयंसेवक व गरज पडल्यास शोध व बचावकार्य करण्यासाठी ५० स्वयंसेवकांची टीम योग्य प्रशिक्षण देऊन सज्ज करण्यात आली आहे.
कोट....
पुराचा धोका असलेल्या गावांना भेट देऊन मागील पूरस्थितीचा आढावा घेतला आहे.
पूररेषेत राहणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जातील. तसेच नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत.
प्रशासनाने पूरस्थितीची पूर्वतयारी पूर्ण केली आहे.
- शरद घोरपडे, तहसीलदार, निफाड