निफाड : तालुक्यात तापमानाचा पारा आणखी घसरला असून, शुक्र वारी १० जानेवारी रोजी कुंदेवाडी येथील गहू संशोधन केंद्रातील हवामान केंद्रात ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाल्याने अवघा तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तालुक्यात थंडी वाढण्यास सुरु वात झाली आहे. गुरु वारी (दि. ९) कुंदेवाडी येथील हवामान केंद्रात ८.८ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली होती. शुक्र वारी ९ अंश सेल्सिअस इतक्या नीचांकी तापमानाची नोंद झाली. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने निफाडकरांना गारठून टाकले होते. गार वारा सुटल्यामुळे थंडीचा सामना करावा लागत आहे. तालुक्यात ऊसतोडीसाठी आलेल्या कामगारांनी, शेतकऱ्यांनी, नागरिकांनी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवून ऊब मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे तालुक्यात दिवसभर गारवा जाणवत होता. त्यामुळे नागरिकांना दिवसभर स्वेटरचा वापर करावा लागला. सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी थंडीमुळे उशिराने आले.ही थंडी गहू ,कांदा पिकांना फायदेशीर ठरणार आहे, मात्र या वाढत जाणा-या कडाक्याच्या थंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे पडणे, फुगवण कमी होणे, द्राक्षाच्या वेलींना अन्नपुरवठा कमी होणे आदी परिणाम दिसू लागल्याने द्राक्ष बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे.
निफाडचा पारा नऊ अंशांवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 4:39 PM