नाशिक : जिल्ह्यात सर्वाधिक उपचारार्थी रुग्ण १० हजार ८०० हे नाशिक शहरातच आहेत, तर ग्रामीणमध्ये सर्वाधिक उपचारार्थी असलेल्या नागरिकांची संख्या निफाड तालुक्यात ८५४ तसेच नाशिक तालुक्यात ७९९ इतकी रुग्णसंख्या आहे. त्यामुळे ग्रामीणमध्ये शहराच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी असली तरी जे तालुके बाधितमध्ये अग्रेसर रहात आहेत, ते नाशिक शहराशी सर्वाधिक नजीकचे आणि ज्यांचा नाशिक शहराशी सर्वाधिक उलाढाल असलेले तालुके आहेत.
२५ दिवसांनंतर रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त जास्त
डिसेंबर महिन्याच्या मध्यावर जिल्ह्यात कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या ३०० च्या आसपास होती. त्यात गत पंधरवड्यात झपाट्याने झालेल्या वाढीमुळे विद्यमान उपचारार्थी रुग्णसंख्या थेट १५ हजारांचा टप्पा ओलांडून थेट १६ हजार २६८वर पोहोचली आहे. त्यातील ९५ टक्के रुग्ण घरीच उपचार घेत असल्याने अद्यापही रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याच्या प्रकारात वाढ झालेली नाही. जिल्ह्यात ४ जानेवारीपर्यंत कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजारपेक्षा कमी होती. ४ जानेवारीला प्रथमच कोरोना उपचारार्थी रुग्णसंख्या एक हजाराचा टप्पा ओलांडून १०४३वर पोहोचला होता. त्यानंतर अवघ्या वीस दिवसात जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येत १५ हजारांची वाढ झाली आहे. मात्र तब्बल २५ दिवसांनी कोरोना बाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णसंख्या अधिक आली आहे.
इन्फो
नाशिक शहरात उपचारार्थी दहा हजारांवर
सर्वाधिक बाधित आणि उपचारार्थी रुग्णसंख्या नाशिक मनपा क्षेत्रात दहा हजार ८०० इतकी आहे. केवळ शहरात इतकी रुग्णसंख्या वाढ ही नक्कीच शहरवासीयांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. मात्र, त्यातही कोरोना रुग्णांचा मृत्युदर शहरासह ग्रामीण भागात समान असून, मृत्युदरात फारशी तफावत नसणे हाच महापालिका क्षेत्राला काहीसा दिलासा आहे.
इन्फो
पेठ, सुरगाणाच दोन आकड्यांत
जिल्ह्यातील उपचारार्थी रुग्णसंख्येतील वाढीचा वेग प्रचंड असून, त्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या गत तीन आठवड्यांहून अधिक काळ सातत्याने कमी होती. केवळ कोरोनामृत्यूला रोखण्यात समाधान न मानता उपचारार्थी रुग्णसंख्या वाढीवरही नियंत्रण मिळवणे अत्यावश्यक बनले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक कमी बाधित पेठमध्ये ७०, तर सुरगाण्यात ५३ असून, कमी बाधित आणि शून्य मृत्यूची परंपरा या दोन आदिवासी तालुक्यांनी तिसऱ्या लाटेत अद्याप तरी कायम ठेवली आहे.