निफाड : तालुक्यातील निफाड, कोठूरे, काथरगाव, जळगाव, सुंदरपूर, कुरडगाव, रसलपूर, कुंदेवाडी, उगाव शिवडी, खेडे, सोनेवाडी खुर्द,थेटाळे, वनसगाव, व तालुक्यातील काही भागामध्ये मंगळवारी सायंकाळी पावणे सात ते साडे सातच्या सुमारास झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू, हरभरा पिकांचे नुकसान होण्याच्या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. तालुक्यातील द्राक्षबागांचा सध्या काढणीचा हंगाम सुरु असून शेतकरी द्राक्ष काढणीमध्ये व्यस्त असताना झालेल्या जोरदार पावसामुळे द्राक्ष मण्यांना तडे जाऊ शकतात त्यामुळे हात तोंडाशी आलेला घास जातो की काय या भीतीने शेतकरी धास्तावला आहे. यंदा कांदा लागवडीच्या सुरूवातीपासूनच हवामान चांगले असल्याने तालुक्याच्या सर्वच भागात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणवर असून तेही काढणीच्या स्थितीत आहे. अशातच आलेल्या अवकाळी पावसाने कांद्याचे मोठ नुकसान होण्याची भिती व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी शेतात काढलेला कांदा भिजला आहे . दोन महिन्यात थंडी चांगली असल्याने गहू पीकही मोठ्या जोमात उभे असून त्यालाही या पावसाच्या फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गहू जमिनीवर आडवा झाला आहे. तर हरभरा पिकाचेही नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. पाऊस सुरू असताना तालुक्यातील अनेक भागात विद्यत पुरवठा खंडित झाला होता. दिंडोरी: तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडुन एक गाय व एक बैल ठार झाला. द्राक्षपीकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याच्या भीतीने द्राक्ष उत्पादक धास्तावला आहे. सायंकाळी अचानक वीजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह दिंडोरी, खेडगावं, जानोरी, मोहाडी, माळेगावं, कोकणगावं, देवपुर आदी गावांसह तालुक्यात जोरदार पावसाने हजेरी लावली.
निफाड तालुक्याला पावसाने झोडपले
By admin | Published: March 01, 2016 11:45 PM